नाशिक : शहरात मागील तीन ते चार दिवसांपासून अचानकपणे दुर्घटना घडून महिला, मुलांचा मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनांमध्ये कुठे हलगर्जीपणा तर कुठे अज्ञान दिसून येते. सातपूर भागात अशीच एक दुर्दैवी घटना घडली. आंघोळीपुर्व बादलीमध्ये गरम पाणी काढत असताना गॅसगिझरचा अचानकपणे भडका उडाला. यामुळे भाजल्याने महिलेचा मृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेखा दिलीप रत्नपारखी (५८) या आंघोळीसाठी बाथरूममधील गॅस गिझर सुरू करून गरम पाणी बादलीत काढत होत्या. यावेळी गिझर अधिक तापल्याने भडका उडाला आणि गिझरने पेट घेतला. या आगीच्या ज्वाला रत्नपारखी यांच्याही अंगावर आल्याने त्यांच्या शरीरावरील कपडेही पेटले. यामुळे त्या जवळपास ६५ टक्के भाजल्या. कुटुंबियांनी तत्काळ त्यांना जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना बुधवारी (दि.२९) संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी अकस्मात नोंद केली असून पुढील तपास हवालदार देवरे हे करीत आहेत.कोरोनाचे वाढते संक्रमण आणि चार महिन्यांपासून सुरू असलेले लॉकडाऊन यामुळे महिलांवर दैनंदिन कामाचा अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. घरातील पुरूष, लहान मुलेदेखील घरांमध्येच थांबून असल्यामुळे कामे वेळेत आटोपशीर घेताना अनेकदा दैनंदिन कामांमध्ये घाईगडबड होऊन अपघात घडत आहेत. मागील चार महिन्यांत यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली असून गृहिणींनी सावधानतेने घरातील कामे करण्यावर भर द्यावा.
बाथरूममध्ये उडाला गॅसगिझरचा भडका; महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 5:25 PM
कोरोनाचे वाढते संक्रमण आणि चार महिन्यांपासून सुरू असलेले लॉकडाऊन यामुळे महिलांवर दैनंदिन कामाचा अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
ठळक मुद्दे त्यांच्या शरीरावरील कपडेही पेटले.