नाशिक : भाजपाचे उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, भुजबळ समर्थक दिलीप खैरे या दोघांनी एकमेकांच्या घेतलेल्या भेटीने शहरातील राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांच्यावर सुडबुद्धीने होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ ओबीसी समाजाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात ही भेट असल्याचा खुलासा नंतर करण्यात आला. येत्या ३ आॅक्टोबर रोजी ओबीसी समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पंचवटीतील तपोवनातून भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन भुजबळ समर्थक तसेच ओबीसी संघटनेकडून प्रयत्न सुरू असून, त्याची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून केली जात आहे. गावोगावी बैठका, मेळावे घेऊन समाज संघटित होण्याची गरज विशद केली जात असून, सध्या मराठा समाजाचे निघणारे भव्य मोर्चे पाहता त्याच धर्तीवर ओबीसी समाजाने एकत्र येऊन ताकद दाखविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थक दिलीप खैरे यांनी सकाळी मुंबई नाका येथे जाऊन माजी आमदार वसंत गिते यांची भेट घेऊन मोर्चाच्या सहभागाविषयी चर्चा केली, मात्र यासंदर्भातील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होऊन भुजबळ समर्थक भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पसरली. खुद्द खैरे हेदेखील ईडी व लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या रडारवर आहेत. त्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी खैरे यांनी भाजपाला जवळ केले असावे, अशी चर्चा त्यानिमित्ताने रंगली, तर भाजपातच गळचेपी होत असल्याने गिते यांनी भुजबळांच्या तुरुंगवारीने ओबीसी समाजात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ओबीसी वा समता परिषदेची चाचपणी सुरू केल्याचेही बोलले गेले. (प्रतिनिधी)
गिते - खैरेंच्या भेटीने चर्चेला उधाण
By admin | Published: September 23, 2016 1:47 AM