ओझर : येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम आगामी काळात अजूनच आकर्षक होणार असून, आश्रम परिसराच्या विविधांगी विकासासाठी जनशांती धामाचे ‘महाद्वार’ भाविकांना दर्शनासाठी दीड महिना बंद करण्यात आले होते. त्यादृष्टीने कामाची गतीही वाढवण्यात आली होती. मात्र महाशिवरात्रीनिमित्ताने होणाऱ्या विशेष महाभिषेक सोहळ्यासाठी जनशांती धामाचे महाद्वार शुक्रवारी (दि. २१) दुपारी ३.३१ वाजता उघडण्यात येणार आहे.निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून ओझर येथे साकारण्यात आलेले देवभूमी ‘जनशांती धाम’ भाविकांसाठी धार्मिक तीर्थक्षेत्र बनले आहे.शांती महागणेश, दक्षिणाभिमुख हनुमान, अष्टविनायक, अष्टलक्ष्मी, अष्टमूर्तीशंकर, १०८ शिवलिंग, १०८ गोमुख, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, बाणेश्वर महादेव, नंदी महाराज, संतमेळा, नवग्रह, सप्तर्षी, दिशा देवता, जगदमाउली म्हाळसामाता, मुक्ताई, अहिल्यादेवी यांसह शेकडो देवी-देवतांची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी जनशांती धाम आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. या धामात बारा ज्योतिर्लिंग, चारधाम आदी मंदिरांची लाल पाषाणात बांधकामे सुरू आहे. याशिवाय मातोश्री फुलामाता, बालोद्यान, लक्षवेधी कारंजा, आकर्षक रस्ते यांसह विविधांगी विकासकामे केली जाणार आहेत. या कामांसाठी जनशांती धाम भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. मात्र महाशिवरात्री उत्सवासाठी जनशांती धामाचे महाद्वार २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांनी उघडण्यात येणार आहे. यावेळी १११ ब्रह्मवृंदाच्या मंत्र घोषात २११ लक्ष्मी-नारायण जोडप्यांच्या हस्ते भगवान बाणेश्वर महादेवासह जनशांती धामातील शेकडो देवी-देवतांचे अभिषेक-पूजन करण्यात येणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय बाबाजी भक्तपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
ओझरच्या जनशांती धामाचे महाद्वार महाशिवरात्रीला उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:24 PM