कळवण : गौराई आली सोन्याच्या पावलांनी, गौराई आली माणीक मोतींच्या पावलांनी, असे म्हणत सर्वत्र लाडक्या गौरार्इंचे आगमन झाले. तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून गौराईचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण, विशेषत: महिलावर्गात उत्साह दिसून आला. भाद्रपद महिन्यातील गौरींचे आगमन हा क्षण मांगल्याचा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. गुरुवारपासून तीन दिवस गौरी-गणपतीचा उत्सव चालणार आहे.फुलवरा, नव्या साड्या, अंगभर दागिने, नथ, पंचपक्वान्नांचे ताट विविध प्रकारची मिठाई, श्रीफळ आणि विवाहित स्त्रीने भरलेली ओटी अशा थाटात गौरीचे पूजन करण्यासाठी स्त्री वर्गाची लगबग दिसून येत होती. गौरी बसविण्याच्या पद्धती सर्व घरांमध्ये वेगळ्या आढळतात. काही ठिकाणी गौरी पाटावर विराजमान होतात तर काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिनहाताच्या आणि खड्यांच्या गौरी असतात. गौरी-गणपतीचा सण थाटामाटातसाजरा केला जात आहे. गौराईच्या आगमनाने खास महिलावर्गात उत्साह असतो. गौरींच्या उत्सव स्थापनेला प्राचीन आणि पूर्वापार महत्त्व असल्याने हा सण उत्साहात साजरा केला जातो, असे राजेंद्र जुन्नरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
गौरींचे उत्साहात आगमन
By admin | Published: September 09, 2016 12:30 AM