नाशिक : ‘सोनपावलांनी या, वाजतगाजत या’ अशा आवाहनासह येणाऱ्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे आज घरोघरी आगमन होणार आहे. गणरायापाठोपाठ तीन दिवसांसाठी येणाऱ्या या माहेरवाशिणींच्या आगमनासाठी महिला वर्गाची प्रचंड लगबग सुरू आहे.
तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून अनेक घरांमध्ये येणाऱ्या गौराईचे स्वागत करण्यासाठी विशेषत्वे महिला वर्गात मोठे उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी होणाऱ्या गौराईच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर साड्यांची दालने, सजावटीच्या साहित्याची दालने तसेच मोत्याचे हार आणि अन्य साहित्य खरेदीसाठी महिलांनी आठवडाभरापासूनच प्रारंभ केला होता. गणरायांबरोबरच गौरीच्या आगमनासाठी केल्या जाणाऱ्या फराळाच्या पदार्थांचीदेखील लगबग घरोघरी सुरू आहे. गौरी आगमनाच्या पूर्वदिनी अर्थात गणेशचतुर्थीला शहर, उपनगर परिसरांतील बाजारपेठेत गौरी सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी दिसून येत होती. गौरी सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यात गौरीच्या दागिन्यांना अधिक महत्त्व असते. शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत गौरीच्या सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध असल्याने या खरेदीला महिलांकडून प्राधान्य दिले जात होते. गौरीच्या दागिन्यांत मंगळसूत्र, नथ, कमरपट्टा, राणीहार अशा दागिन्यांना विशेष मागणी होती, तर अनेक महिलांनी गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी गौरीसाठी साडी खरेदीकडे मोर्चा वळविला होता. गौराईसाठी विविध प्रकारच्या साड्याही बाजारात असल्या तरी त्यात पारंपरिक, काठापदराच्या, भरजरीच्या, आकर्षक रंगांच्या विविध नक्षीकाम असलेल्या साड्यांना विशेष मागणी होती. गौरी सजावटीसोबत समोर मांडण्यात येणाऱ्या पदार्थांनाही महत्त्व असते. त्यामुळे अनेक घरांमध्ये शुक्रवारपासूनच फराळाच्या पदार्थांच्या तयारीलादेखील वेग देण्यात आला होता. गौरी बसविण्याच्या पद्धती तसेच अनेक घरांमधील चालीरीती विभिन्न असल्या तरी गौराईबाबतचा उत्साह सर्वत्र सारखाच आहे. काही घरांमध्ये गौरी पाटावर विराजमान होतात. काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिनहाताच्या, कुठे खड्यांच्या गौरी, कुठे माठावर, कुठे हंडा-कळशीवर बसविल्या जात असल्याने परंपरेनुसार सर्व घरांमध्ये गौराईच्या आगमनाची लगबग दिसून येत आहे.