नाशिक : सुफी संत हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी ऊर्फ गौस-ए-आझम यांच्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक, वडाळागाव परिसरातून बुधवारी (दि.१९) ‘जुलूस-ए-गौसिया’ची मिरवणूक काढण्यात आली. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली गौस-ए-आझम यांच्या स्मृतिदिनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चौक मंडई येथील जहांगीर मशिदीपासून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी खतीब यांनी प्रार्थना करत संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा मागितली. यावेळी मौलाना महेबूब आलम, मौलाना रहेमत उल्ला मिस्बाही, मौलाना वासिक रजा, मौलाना शमशोद्दीन मिस्बाही, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, एजाज काझी, एजाज रजा मकरानी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी उपस्थित धर्मगुरूंचे स्वागत केले. मिरवणूक बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, चव्हाटा, नाईकवाडीपुरा, काजीपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, पिंजारघाटमार्गे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बडी दर्गाच्या प्रांगणात पोहचली.मिरवणुकीमध्ये दारुल उलूम सादिकुलउलूम, मदरसा गौस-ए-आझमचे विद्यार्थी पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर हिरवे ध्वज, पताका लावून सजावट करण्यात आली होती. तसेच ठिकाठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. खडकाळी परिसरातील सजावट लक्षवेधी ठरली. सहभागी समाजबांधव धार्मिक काव्य पठण करत मिरवणुकीत संचलन करतहोते. दरम्यान, मीर मुख्तार हे अग्रभागी राहून गौस-ए-आझम यांच्या जीवनकार्याविषयी माहिती ध्वनिक्षेपकावरून देत होते.बडी दर्गाच्या आवारात दरुदोसलाम व फातेहा पठण करून संध्याकाळी सहा वाजता मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
गौस-ए-आझम स्मृतिदिन मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 1:13 AM