नाशिक : स्मार्ट सिटी आणि आयुक्त यांच्याविरोधात घोषणाबाजी करत अंबड परिसरातील गौतमनगर व साठेनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा नेत निदर्शने केली. घर हक्क समिती आणि मार्शल ग्रुप यांच्या वतीने गौतमनगर, साठेनगर येथील रहिवाशांनी महापालिकेवर मोर्चा आणत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आयुक्तांनी स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मांडताना शहरातील झोपडपट्ट्या आहे त्याच ठिकाणी पुनर्वसित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले; परंतु दुसरीकडे गौतमनगर, साठेनगरातील रहिवाशांच्या घरांना महापालिकेकडून रेड मार्किंग केले जात आहे. रहिवाशांना चुंचाळे शिवारात जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत बांधलेल्या घरामध्ये स्थलांतरित करण्याचा विचार सुरू असून, त्याला रहिवाशांचा ठाम विरोध आहे. महापालिकेने साठेनगर, गौतमनगराचे पुनर्वसन आहे त्याच जागेवर करावे, नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, भुयारी गटार व शौचालय बांधावे, अंगणवाडी सुरू करावी तसेच राजीव आवास योजनेची अंमलबजावणी करून घरे बांधावीत आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मोर्चाचे नेतृत्व प्रशांत खरात, सचिन मोरे, राहुल उजागरे, प्रवीण जाधव, दिलीप मोरे, राजपालसिंग राणा, करिश्मा देशमुख, कविता वाणी, अश्विनी ठाकरे, ज्ञानेश्वर साळवे आदिंनी केले.
गौतमनगर, साठेनगरमधील रहिवाशांचा पालिकेवर मोर्चा
By admin | Published: December 15, 2015 12:18 AM