नाशिक : चोवीस तास मुबलक पाणी, रुंद रस्ते आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर होणाऱ्या उणिवा अत्यंत विलक्षण बदलाचे हे चित्र आता शहराच्या गावठाणात दिसणार आहे. नाशिक व पंचवटी गावठाणांचा विकास करून चोवीस तास पाणीपुरवठा तसेच रस्ते आणि अन्य मूलभूत कामांचा विकास करण्यासाठी ३२२ कोटी रुपयांच्या विस्तृत प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली असून, लवकरच त्याच्या निविदा निघणार आहेत. नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सीटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या शुक्रवारी (दि.२०) झालेल्या या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सदर बैठकीस महापौर रंजना भानसी, संचालक आयुक्त तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती हिमगौरी अहेर, सभागृह नेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, नगरसेवक शाहू खैरे, नगरसेवक गुरुमित बग्गा, सनदी लेखापाल तुषार पगार, स्वतंत्र संचालक भास्करराव मुंढे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल हे उपस्थित होते. यावेळी गावठाण स्मार्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मान्यता देण्यात आली. जुन्या गावाठाणाच्या विकासासाठी खास आराखडा तयार करण्यात आला आहे. या भागातील सर्वांत महत्त्वाची समस्या पाणीपुरवठ्याची आहे. उंचसखल भागात आता २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी बारा बंगला तसेच पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथे दोन मोठे जलकुंभ मोठ्या उंचीवर बांधण्यात येणार असून, दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढण्यिात येणार आहे. पाच छोटे जलकुंभ बांधण्यात येणार असून, त्यामुळे उंचीवरील इमारतींमध्येदेखील गुरत्वाकर्षणामुळे पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. याशिवाय गावठाणातील मोठ्या म्हणजे सहा मीटरपेक्षा जास्त तसेच छोट्या म्हणजे सहा मीटरपेक्षा कमी रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. तसेच भूमिगत गटारींची व्यवस्था सुधरवण्यात येणार आहे. सदर कामामध्ये सर्व पायाभूत सुविधांचा समावेश असल्याने पुन्हा पुन्हा रस्ते खोदण्याचे काम करावे लागणार नाही. रस्त्यालगत जमिनीखाली सुमारे ५० फुटांवर डक्ट तयार करण्यात येणार असून, जलवाहिनी आणि मलवाहिकांबरोबर विजेच्या तारांचेदेखील जाळे जमिनीखालून असणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, कुठेही गळती झाली तर तत्काळ ती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोधता येणार आहे, असे प्रकल्प सादरीकरणाच्या वेळी सांगण्यात आले.याचवेळी विविध प्रकल्पांचा आढावा प्रसिद्ध केलेल्या पब्लिक बायसिकल शेअरिंगच्या (एक हजार सायकल) निविदेची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये डॉकिंग व डॉकलेस स्टेशन प्रस्तावित आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या सहकार्याअंतर्गत विविध कोर्सेसच्या योजनेस तत्त्वत: मान्यता देण्यात आली.स्मार्ट सीटीअंतर्गत मंजूर झालेले प्रकल्पप्रोजेक्ट गोदा : गोदावरी नदी विकासासाठी सुशोभिकरण व पायाभूत घटकांचा विकास या सुधारित विस्तृत प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे. गोदापात्र सुशोभिकरणाअंतर्गत केंद्र सरकारच्या निधीतून लेझर शोचे नियोजन आहे.४सोळा कार्यालय सौरउर्जेवर : महापालिकेची विविध सोळा कार्यालये सौरउर्जेवर चालविण्यासाठी पीपीपी शेअर मॉडेल तयार करण्यात आले असून, त्या अंतर्गत ४ रुपये ५९ प्रति युनिट विजेचा दर सादर करणाºया योजनेअंतर्गत संगम डिव्हायजर्सच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.पलुस्कर नाट्यगृह नूतनीकरण : पंचवटीतील पं. पलुस्कर नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्याअंतर्गत २ कोटी ३३ कोटी रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली.मल्टी युटिलिटी सेंटर : कौशल्य विकास, स्टार्ट अप, संशोधनाचे संगोपन करण्यासाठी व मध्यवर्ती वाचनालयाचा विकास करण्यासाठी मल्टी युटिलिटी सेंटरची स्थापना करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली.
गावठाण होणार स्मार्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 1:05 AM