नाशिक : गेल्या दहा वर्षांपासून राजपत्रित महासंघाकडून राबविण्यात येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ‘कार्यसंस्कृती’ अभियानाचे अपयश म्हणूनच शासनाला सेवा मागणी कायदा करावा लागल्याची अप्रत्यक्ष कबुली देत, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता ‘गाठी-भेटी’ संस्कृतीबरोबरच सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ‘पगारात भागवा’ अभियान राबविण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांनी केली. नाशिक येथे महासंघाच्या बैठकीसाठी आलेल्या कुलथे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारने सेवा मागणी कायदा केल्याबद्दल तसेच बदल्यांच्या विक्रेंद्रीकरणाचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. बदल्यांसाठी मंत्र्यांना अधिकारी व कर्मचारीच भेटत असल्याची कबुली देत, त्यामुळे भ्रष्टाचार होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता बदल्यांचे विक्रेंद्रीकरण करण्यात आल्याने त्याला अटकाव बसेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पण जोपर्यंत राज्य सरकारमधील रिक्तपदे भरली जाणार नाही तोपर्यंत सेवा मागणी कायदा करूनही उपयोग नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने सर्व पदे भरल्यास जनतेला योग्य व तत्काळ सेवा देता येईल, असे सांगून, दहा वर्षांपासून महासंघाने याच कारणासाठी कार्यसंस्कृती अभियान राबविले होते तरीही शासनाला कायदा करावा लागला याची कबुलीही त्यांनी दिली. शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ‘पगारात भागवा’ अभियान महासंघाकडून राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
राजपत्रित अधिकारी महासंघ : भ्रष्टाचार थोपविण्याचा उपाय
By admin | Published: December 18, 2014 10:53 PM