नाशिक : गजपंथ क्षेत्र हे कोट्यवधी वर्षांचा इतिहास जपणारे आहे, त्यामुळे या क्षेत्राला वेगळे महत्त्व असल्याचे मत समतासागरजी यांनी व्यक्त केले. श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र गजपंथ म्हसरूळचा वार्षिक मेळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आचार्य समतासागरजी महाराज, मुनिश्री आगमसागरजी ससंघ, अर्यिका विशाश्रीजी, आर्यिका चिन्मयश्री माताजी, क्षुल्लिका सुलिब्धश्री माताजी यांच्या सान्निध्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्ताने आनंद मेळ्याचे उद््घाटन महापौर रंजना भानसी व नगरसेवक अरु ण पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रतिभावंतांचा सन्मानही करण्यात आला. नाशिक विभागातून सीए परीक्षेत प्रथम आलेल्या सुयश बडजाते, अंशुल लोहाडे, दिलीप पहाडे यांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर धार्मिक प्रश्नमंजूषाचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना हजारो रुपयांची चांदीची बक्षिसे देण्यात आली. मेळाव्याच्या निमित्ताने सनदी लेखापाल लिना बंब यांचे आर्थिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. मेळाव्याचा भगवंताची शोभायात्रा आयोजित करण्यात आली. त्यानंतर पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी आचार्य समतासागरजी महाराज यांनी सांगितले की, गजपंथा क्षेत्र हे करोडो वर्ष प्राचीन असून, याचा इतिहास संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
गजपंथ क्षेत्र हे करोडो वर्षांचा इतिहास जपणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:30 AM