नाशिक : मराठी मनाचा ठाव घेणारा, प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र उलगडून दाखविणाऱ्या 'गीत रामायण' या कार्यक्रमातील गीतांची मोहिनी रसिक मनांवर गत सहा दशके कायम असल्याचीच प्रचिती शुक्रवारच्या कार्यक्रमाने दिली. त्या आवडीचा प्रत्ययच नाशिककर रसिकांकडून डॉ. कुर्तकोटी सभागृहात मिळाला. नांदेडच्या संजय जोशी आणि औरंगाबादच्या वर्षा जोशी यांनी गायलेल्या गीत रामायणातील गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्यावतीने गीत रामायणाच्या निर्मितीस ६७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रत्येक शहरात संजय जोशी यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम झाला. नाशिकमध्ये शंकराचार्य संकुलात झालेल्या या गीतांना नाशिककरांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाने रसिकांना पुन्हा एकदा जुन्या आठवणीत नेले. सहा दशकांहून अधिक काळ झाला असला तरीही तितकेच ताजेतवाने, रसरशीत वाटणारे... अन् मानवी भावभावनांचे अदभूत दर्शन घडविणारे 'गीत रामायण' रसिक-श्रोत्यांना संजय जोशी आणि वर्षा जोशी यांनी आपल्या तरल आणि गोड आवाजात मोहून टाकले. गीतरामायणातील ‘स्वये श्रीराम प्रभु ऐकती या पहिल्याच गीतापासून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यानंतर दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला गं सखे, सावळा गं रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो, ज्येष्ठ तुझा पुत्र देई दशरथा, स्वयंवर झाले सीतेचे, माता न तू वैरिणी, दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, नको आसू ढाळू आता पूस लोचनास’आदी गीतांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायकांना हार्मोनियमवर डॉ. प्रमोद देशपांडे, व्हायोलिनवर पंकज शिरभाते, तबल्यावर डॉ. जगदीश देशमुख, तालवाद्यावर भगवान देशमुख यांनी साथ केली. दिलीप पाध्ये यांनी खुमासदार निवेदन केले.