नाशिक : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी २०१७च्या पहिल्या आठवड्यात कधीही लागू होण्याची शक्यता असल्याने महापौरांनी येत्या ३० डिसेंबरला निरोपाची महासभा बोलाविली असून, यावेळी प्रलंबित प्रस्तावांसह इतिवृत्तांना मंजुरी दिली जाणार आहे. सुमारे १६ महासभांच्या इतिवृत्तांना मंजुरी न मिळाल्याने प्रशासनालाही कामकाज करताना अडथळे येत आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक होणार असून, १० जानेवारी २०१७ च्या आसपास कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरांनी अखेरची महासभा शुक्रवार, दि. ३० डिसेंबरला बोलाविली आहे. सदरची महासभा ही चालू पंचवार्षिक काळातील शेवटची ठरणार असल्याने यावेळी निरोपाचा सूर राहणार आहे. महासभेत प्रलंबित अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरील इतिवृत्तांनाही अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने त्यांचेही प्रस्ताव ठेवले जाणार आहेत. सुमारे १६ महासभांचे इतिवृत्त मंजुरीअभावी नगरसचिव विभागाकडे पडून आहेत. सदर इतिवृत्तांना मंजुरी न मिळाल्याने अनेक ठराव, प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी रखडले आहेत, शिवाय प्रशासनाला कामकाज करतानाही अडचणी निर्माण होत आहेत.
३० डिसेंबरला मनपाची निरोपाची महासभा
By admin | Published: December 23, 2016 1:00 AM