नाशिक : जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतिंद्र पगार यांना सोमवारी (दि.८) सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पगार यांनी सायंकाळच्या सुमारास काही सदस्यांना बोलताना थांबवून सभा आटोपती घेण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी यतिंद्र पगार यांना खडे बोल सुनावत तुम्ही सभेला गांभीर्याने घेत नसाल तर किमान सदस्यांना त्यांच्या समस्या तरी मांडू द्या, असे खडे बोल सुनावत सदस्यांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात रोष व्यक्त केला. आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी पुनर्नियुक्ती व वेतनाच्या प्रश्नावर यतिंद्र पगार यांनी सोमवारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यांना अन्य सभापती व सदस्यांनीही पाठिंबा दिला होता. परंतु, सर्वसाधारण सभेपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी त्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन रद्द केले.परंतु, या गोष्टीची माहिती अन्य सदस्य व पदाधिकाऱ्यांना मिळाली नसल्याने बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह अन्य सदस्यांनी पगार यांना आंदोलन का झाले नाही, असा प्रश्न केला. तर सायंकाळी पगार यांनी सदस्यांना बोलण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केल्याने कळवणचे सदस्य नितीन पवार यांनी यतिंद्र पगार यांच्यावर रोष व्यक्त केला. प्रशासन तुमचे ऐकत नाही, त्यामुळे तुमच्यावर उपोषणाची वेळ येते, असे असताना किमान सर्वसाधारण सभेत सदस्यांना बोलू द्या तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी सर्वसाधारण सभेत नाही तर त्यांचे प्रश्न मांडायचे कधी असा सवालही नितीन पवार यांनी सभापतींना केला.
सर्वसाधारण सभेत यतिंद्र पगार यांच्यावर सदस्यांचा रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:53 AM