-----
भवानी चाैकात होणार उड्डाण पूल
नाशिक : शहरातील त्र्यंबक रोडवरील भवानी चौकात महापालिकेच्या वतीने लवकरच उड्डाण पूल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले असून, आगामी अंदाजपत्रकात त्यासाठी मोठी तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौकातदेखील उड्डाण पूल साकारण्यात येणार आहे. त्याचीदेखील चाचपणी सुरूच आहे.
----
सफाई ठेकेदारावर कारवाईची मागणी
नाशिक : आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून सफाई कामगार नियुक्त करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची अनामत रक्कम घेणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ठेकेदारांनी कबुली देऊन देखील काही अधिकारी ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप सुरेश दलोड, सुरेश मारू, ताराचंद पवार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
-----
सीएनजी गॅसपंपांची संख्या वाढवण्याची मागणी
नाशिक : शहरात काही मोजक्याच ठिकाणी सीएनजी गॅसची सुविधा उपलब्ध आहे. ही संख्या तातडीने वाढवावी, अशी मागणी भद्रकाली ऑटोरिक्षा युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. पर्यावरणासाठी पोषक असलेेले हे इंधन परवडणारे देखील आहे. परंतु मोजकेच गॅसपंप असल्याने तो सर्वांना मिळत नाही. त्यामुळे अशा गॅसपंपांची संख्या वाढवावी, अशी मागणी भद्रकाली ऑटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष हैदर सय्यद, हेमंत नाटकर, प्रकाश हिरे, रवी जाधव, भागुजी आव्हाड यांनी केली आहे.
-----
निमाणी स्थानक परिसरातील पथदिवे बंद
नाशिक : पंचवटी येथील निमाणी बसस्थानकाच्या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पथदिवे बंद आहेत, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना अंधारातच उभे राहावे लागते. अंधारामुळे चोरट्यांचे देखील फावले आहे. त्यामुळे येथील पथदिवे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी भारतीय वाल्मीकी समाज नाशिक शाखेचे अध्यक्ष अजय तसांबड, अशोक पारचा, संजय कल्याणी, संजय खरालिया यांनी पंचवटी आगार स्थानक प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
------
मनपात पदोन्नती रखडल्याने नाराजी
नाशिक : महापालिकेत स्थायी समितीने आदेश दिल्यानंतर देखील पदोन्नतीला चालना मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परसेवेतील काही अधिकारी जाणीवपूर्वक स्थानिक अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
----------------