जनसेवा मंडळातर्फे साहित्य वाटप
ठाणगाव : येथून जवळच असलेल्या काळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. जनसेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स, पेन, बुक, बिस्कीट पुडे जनसेवाचे सदस्य बबन काकड, अर्जुन आव्हाड, उत्तमराव शिंदे, ज्ञानेश्वर भोर, भरत गुंड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
खडांगळीला उन्हाळ कांद्याची चोरी
सिन्नर : तालुक्यातील खडांगळी येथील शिवारात शेतात काढलेला २५ क्विंटल उन्हाळ कांदा चोरट्यांनी चोरून नेला. सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. खडांगळी-पंचाळे शिवारात शेतकरी कारभारी आनंदा पगार यांच्या शेतात उन्हाळ कांदा काढणीचे काम सुरू आहे. शेतमजुरांनी शेतात उन्हाळ कांदा काढून कांदा पातीत झाकून ठेवला होता.
जंतनाशक गोळ्यांचे विद्यार्थ्यांना वाटप
सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील लोकशिक्षण मंडळ संचलित व्ही. पी. नाईक
विद्यालयात आरोग्य विभागातर्फे सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. जंतनाशक गोळ्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण
सिन्नर : ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या दोन टप्प्यात २८०० जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले आहे. मंगळवारपासून कोविड-१९ लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांत ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घेतली. विशेष म्हणजे लस टोचून घेतलेल्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे.