------------------------------------------
कोरोनाने वाढवली पालकांची चिंता
नांदूरशिंगोटे : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे सावट काही केल्या संपेना. शाळा, शिकवणी वर्ग बंद झाल्याने मुलांना घरातच बसण्याची वेळ आली. परिणामी मुलांमध्ये उनाडपणा व चिडचिडेपणादेखील वाढला आहे. टीव्ही, मोबाइल याचा अतिवापर झाल्यानेही साहित्य उपयुक्त न होता त्रासदायक ठरू लागले आहे. त्यात डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ लागल्या असून पालकांनी मोबाइल, टीव्ही पाहू न दिल्यास त्यांच्यात चिडचिडेपणा वाढला आहे. त्यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
------------------------------------
नागरिकांची आरोग्य तपासणी
नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य अभियानाच्या अंतर्गत सेविका, आशा कर्मचारी, शिक्षक घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
---------------------------
‘गाव तेथे लसीकरण केंद्र सुरू करा’
नांदूरशिंगोटे : कोरोनाचे संकट राज्यासह देशामध्ये आहे. सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. हे संकट दूर करण्यासाठी गावागावांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे, गाव तेथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी कणकोरीच्या सरपंच योगिता सांगळे यांनी केली. कोरोना महामारी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे.
------------------------------
बसस्थानक पडले ओस
नांदूरशिंगोटे : प्रवाशांची सतत वर्दळ असलेले तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बसस्थानक गेल्या काही दिवसांपासून ओस पडले असून त्याची बकाल अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे बससेवा बंद असल्याने स्थानक ओस पडले आहे. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील येथील बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते.
कोविड योद्ध्यांचा सन्मान
नांदूरशिंगोटे : वैद्यकीय, पत्रकारिता, डॉक्टर, ॲम्ब्युलन्सचालक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना सिन्नर येथे वंजारी समाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या वेळी मेघा दराडे, संदीप भालेराव, बाळासाहेब हांडे आदींसह पुरस्कारार्थी व समाजबांधव उपस्थित होते.