लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाबाधितांच्या जवळपास जायलादेखील नागरिक घाबरत असतात. त्यात जर एखाद्या बाधिताचे निधन झाले तर त्याची बॉडी शासकीय नियमानुसार विशिष्ट पद्धतीने प्लास्टीकमध्ये पूर्णपणे गुंडाळून मगच संबंधित कुटुंबीयांकडे सोपविली जाते. मात्र, मृतदेह हाताळणीचे हे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजंदारीच्या नियमानुसार दिवसाला केवळ ४०० रुपयेच मिळतात.
कोरोनाबाधितांसंदर्भात नागरिकांच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे त्या बाधिताच्या संपर्कात येणाऱ्याला कोरोना होतो. त्यामुळे कोरोनाबाधिताच्या संपर्कात येण्यापासून प्रत्येक नागरिक स्वत:ला दूर ठेवू इच्छितो. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी तसेच शासकीय रुग्णालये, मनपा रुग्णालयांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालून का होईना दररोज बाधितांच्या संपर्कात राहावे लागते. त्यातही ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाधितांच्या मृतदेहांना प्लास्टीकमध्ये गुंडाळण्याचे काम करावे लागते, ते तर त्यांच्यासाठी जीवावरचा धोका पत्करण्याइतकेच बिकट असते. तरीदेखील या कंत्राटी कामगारांना नियमानुसार रोजंदारीच्या तत्त्वावर ४०० रुपये रोज इतकेच पैसे मिळतात. त्यातही हे कंत्राटी कामगार रोजंदारी तत्त्वावर कामावर असल्याने महिन्यातून एक दिवसही सुट्टी झाली, तरी त्यांना त्या दिवसाचा रोजगार मिळत नसतो. त्यामुळे अशा प्रकारे जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या कंत्राटी कामगारांना मिळणारी रक्कम अगदीच तुटपुंजी असल्याचा या कामगारांचा सूर आहे. अर्थात काही नागरिक त्यांना बॉडी गुंडाळून देण्यासाठी काही रक्कम देतात, हे जरी खरे असले तरी निर्धारित रक्कम एकूणच त्यांच्या कामातील धोक्याच्या तुलनेत खूप कमी आहे, हेदेखील वास्तव आहे.
इन्फो
करावे लागते काम
संबंधित व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या बॉडीला सॅनिटायझरने पूर्णपणे साफ केले जाते. त्यानंतर रुग्णालयातील उपलब्ध प्लास्टीकच्या वेष्टनात गुंडाळून ठेवत केवळ त्याचे तोंड उघडे ठेवले जाते. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना त्या बॉडीचा चेहरा दाखवून अंतिम दर्शन दिले जाते. त्यानंतर ती बॉडी डोक्याच्या केसापासून पूर्णपणे पॅक करून तसेच त्याला आवश्यक तो टॅग लावून शवागारात ठेवणे किंवा कुटुंबीयांच्या योग्य त्या कागदपत्रांवर सह्या घेऊन झालेल्या असल्यास ती बॉडी त्यांच्या ताब्यात देण्यापर्यंतचे काम या कंत्राटी कामगारांना करावेे लागते.
-----------
कोट
आम्ही सर्व जण जीवावर उदार होऊन काम करतो. सामान्य नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून शासन आदेशानुसार बॉडीला निर्धारित प्लास्टीकमध्ये गुंडाळून देताना आमच्या जीवाचाही धोका असतो. मात्र, तरीही आम्ही तो धोका पत्करून ते काम करतो. त्यासाठी आम्हाला दिला जाणारा राेज अत्यल्प आहे.
तुकाराम कदम, कंत्राटी कर्मचारी
---
कोट
आम्हाला मिळणारा रोज अगदीच कमी असून आम्ही गत वर्षभराहून अधिक काळ हे प्रचंड धोक्याचे काम करीत आहोत. जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या कामगारांचा रोजगार वाढविण्याचा शासनाने आणि ठेकेदाराने विचार करावा. तसेच रोजंदारीपेक्षा मासिक तत्त्वावर वेतन देऊन सुट्ट्यांचे पैसे कापू नयेत.
जालंदर गुठ्ठे, कंत्राटी कर्मचारी