आनंद खरेमुल्लरची पहिली हॅट्ट्रीक - डेस्नीचा सर्वात जलद गोल तर आज स्पेनसाठी ‘करो या मरो’ची परिस्थितीविश्वचषकातील नेयमार, मेस्सीची जादुई झलक बघितल्यानंतर सर्वांना प्रतीक्षा होती ती फुटबॉलचा आणखी एक स्टार ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्याही जादुई खेळाची. नेयमार मेस्सीने गोल करत आपापल्या संघाला विजय मिळवून देतानाच आपल्या असंख्य चाहत्यांनाही खूश केले, मात्र तशीच आस लागून राहिलेल्या रोनाल्डोच्या चाहत्यांना मात्र निराश व्हावे लागले. अर्थात जर्मनचा इतिहास बघता ३ वेळा विश्वविजेता, २ वेळा उपविजेता, चार वेळा ३ रा क्रमांक आणि एक वेळा ४ था क्रमांक मिळविणाऱ्या जर्मनीने विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याचाही विक्रम केलेला आहे. जर्मनीनेही आत्तापर्यंत फ्रान्स बॅकेनबोर, लोथर मथायस, जोर्गन क्लिन्समन, मायकेल बलाक असे अनेक दिग्गज खेळाडू घडवले आहेत. मात्र एखाद दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून न रहाता जर्मनीने कायमच सांघिक खेळावरच भर दिलेला आहे. आत्ताच्या संघातही फिलीप लॅम, लुकास पोडस्की, बास्तीन स्वानस्टायकर, थॉमस मुल्लर, मेसुट ओझेल, मिलेस्लाव क्लोस, सामी खेदेरी अशा एकापेक्षा एक सरस खेळाडूंची जंत्रीच जर्मनीकडे असल्यामुळे कोणाला खेळवावे आणि कोणाला बसवावे हा प्रश्न पडतो. याउलट पोर्तुगालची कामगिरी डोळ्यात भरण्यासारखी नाही आणि पोर्तुगाल नेहमीच एक-दोन स्टार खेळाडूवर अवलंबून राहिलेला आहे. या आधी ल्युईस फिगो, फर्नाडो कुटो आणि आता ख्रिस्टीयानो रोनाल्डोवर पूर्णपणे अवलंबून आहे. अर्थात रोनाल्डोचे रियाल मॅद्रिदचे जोडीदार पेपे आणि फॅबीओ कोईट्रो, मॅन्चेस्टर युनायटेडचा नानी तसेच अल्मेडा, बुनो अल्वेस, परेरा यांच्या एकत्रित प्रयत्नांनी पोर्तुगालने जागतिक क्रमवारीत स्पेन (नं. १) ब्राझील (नं.२) नंतर ३रा क्रमांक मिळवत ब्राझील, अर्जेंटीना, नेदरलॅन्ड या दिग्गज संघांना मागे टाकले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जर्मनी-पोर्तुगाल या सामन्यात पहिली १० मिनिटे या दोन्हीही संघांनी नंबर २ व ३ ला साजेसा खेळ करत एकमेकांना आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र या सामन्याचे पंच मॅझेक मार्डोल यांनी जर्मनीला पेनल्टी बहाल केली आणि पोर्तुगाल काहीसे डिस्टर्ब झाले. थॉमस मुल्लरने मारलेल्या या पेनल्टीमुळे पुढे गेलेल्या जर्मनीशी बरोबरी करण्याचा रोनाल्डो, पेपे, नानी, अल्मेडा यांनी चांगले प्रयत्न केले, मात्र प्रतिहल्ल्यात तरबेज असणाऱ्या जर्मनीने ३१ व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नर किकवर जर्मनीच्या ह्युमेईलच्या हेडरने गोल करून आघाडी डबल केली आणि तेथेच पोर्तुगीज बिथरले. त्यांचा संयमच ढळला, त्यांच्याकडून वारंवार चुका आणि धसमुसळा खेळ होऊ लागला. परिणामी त्यांचा महत्त्वाचा बचावपटू पेपेच्या वर्तनामुळे त्याला या स्पर्धेतील पहिले लाल कार्ड मिळाले. त्यामुळे पोर्तुगालचा बचाव तर खिळखिळा झालाच शिवाय त्यांना पुढील तासाभराचा खेळ १० खेळाडूंनीशी खेळण्याची वेळ आली. याचा फायदा घेत थॉमस मुल्लरने आपला दुसरा आणि जर्मनचा तिसरा गोल करून जवळजवळ पूर्वार्धालाच सामन्याचा निकाल जणू निश्चित केला. उत्तरार्धात जर्मनीने आपल्या इतर खेळाडूंना संधी दिली मात्र मैदानाबाहेर जाण्यापूर्वी थॉमस मुल्लरने पोर्तुगालच्या बचावपटूच्या चुकीचा फायदा घेत गोलपोस्टसमोर मिळालेल्या चेंडूवर गोल करत जर्मनीचा चौथा आणि आपला ३ रा गोल करत या स्पर्धेतील हॅट्ट्रिक नोंदवली. रोनाल्डोच्या खेळाचा विचार करता दोन गोल बसल्यावर त्याने नेहमीप्रमाणे गोलपोस्टमध्ये मुसंडी न मारता मोजक्या मिळालेल्या पासवर लांबूनच किक मारून गोल करण्याचे प्रयत्न केले आणि आता या सामन्यात फारशी रिस्क न घेता उर्वरित दोन सामन्यांमध्ये जोमाने प्रयत्न करण्याचा त्याचा विचार त्याच्या बॉडीलँग्वेजवरून दिसून येत होता. अर्थात यासाठी पोर्तुगालच्या पुढील सामन्यापर्यंत वाट पहावी लागेल. अमेरिकेने हिशोब चुकता केला - खरंतर फ हा गट ग्रुप आॅफ डेथ बनलेला आहे. कारण या गटात समावेश असणाऱ्या जर्मनी, पोर्तुगाल, अमेरिका आणि घाणा या चारही संघांनी गेल्या विश्वचषकात पहिल्या सोळामध्ये स्थान मिळविले होते. आता जर्मनीच्या विजयामुळे त्याचे या गटातील पहिले स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे उर्वरित तीन संघांपैकी दोघांचे गटातील मरण अटळ आहे. या पार्श्वभूमीवर १-१ बरोबरीनंतर अखेरच्या क्षणी अमेरिकेने घाणावर मिळविलेला विजय त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेच्या डेस्नीने १ मिनिटाच्या आत नोंदविलेला गोल हा या स्पर्धेतील सर्वात जलद ठरलेला आहे. जर्मनचा १९९० च्या विश्वविजेत्या संघातील महत्त्वाचा राहिलेला खेळाडू जुर्गर क्लिन्समनकडे अमेरिका संघाची सूत्रे आहेत. या संघाने घाणावर विजय मिळवून गेल्या विश्वचषकातील उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांच्याकडून झालेल्या पराभवाचीही परतफेड केली.इराण-नायजेरिया पहिला सामना बरोबरीत - इराण नायजेरिया या सामन्याची फारशी उत्सुकता नव्हतीच. तसाच निरस झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांना एकही गोल बघायला मिळाला नाही. ०-० बरोबरीने त्यांना मिळालेला १-१ गुण मिळाला. या गटातील अर्जंेटिना आणि बोस्निया-हर्जीगोव्हीना यांचा खेळ बघता हा १-१ गुणच त्यांची या विश्वचषकातील कमाई ठरू शकतो.आज स्पेनसाठी ‘करो या मरो’ची स्थिती - पहिल्या सामन्यात ५-१ असा मानहानिकारक पराभव आणि चीलीने आॅस्ट्रेलियावर केलेली ३-१ अशी मात या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या स्पेन-चीली हा सामना स्पेनसाठी ‘करो या मरो’ असाच असणार आहे. कारण या सामन्यात हार झाल्यास स्पेन थेट स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल आणि चीलीचा पुढील प्रवेशही निश्चित होईल. त्यामुळे सध्या तरी नंबर १वर असणाऱ्या या गत विश्वविजेत्या या रेड फ्युरी (स्पेन) संघाचे कॅसीलेस, झावी, आंद्रेस आईन्स्टा, सेस फॅब्रीगास, फर्नाडो टोरेस या दिग्गज खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक व्हीन्सट बॉस्कू यांची प्रतिष्ठाच पणाला लागलेली आहे. आणि म्हणूनच हा सामना प्रेक्षकांसाठी मात्र मेजवानीच ठरणार हे मात्र निश्चित.
जर्मन आर्मीने तोफ डागली - रोनाल्डो घायाळ
By admin | Published: June 17, 2014 10:48 PM