नाशिक : द्वारका येथील बॉम्बसदृश वस्तू सापडण्याच्या घटनेला आठ दिवस पूर्ण झाले असून, या कालावधीत पोलिसांना ही वस्तू कोणी ठेवली हे सोडाच, परंतु ते स्फोटक असण्याबाबतही प्रयोगशाळेकडून पुष्टी झालेली नाही. त्यामुळे सध्या तपास थंडावला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी या भागाचे नगरसेवक सचिन मराठे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.शहरातील द्वारका भागात रवींद्रनाथ विद्यालयाच्या समोरील बाजूस असलेल्या एका इमारतीच्या जवळ झाडाखाली गेल्या २५ मे रोजी बॉम्बसदृश वस्तू आढळली होती. येथील नागरिकांनी आधी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार तातडीने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्वानपथकासह तपासणी करून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले होते. सदरची वस्तू रवींद्रनाथ विद्यालयाच्या मोकळ्या मैदानात नेऊन नष्ट करण्यात आली होती. तथापि, ही वस्तू नक्की काय होती, याचा तपास अद्याप लागलेला नाही. पोलिसांनी या वस्तूचे भाग न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. मात्र, तेथून अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे ही वस्तू कोणी ठेवली, याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून, त्यातही पोलिसांना यश आलेले नाही.पोलीस यंत्रणेकडून तपास थंडावल्याच्या पार्श्वभूमीवर येथील शिवसेना नगरसेवक सचिन मराठे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांना निवेदन दिले आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे. सदरची वस्तू सापडली त्या भागात अनेक शाळा आहेत. त्यातच हा विविध भाषिकांचा भाग असल्याने त्यांच्या एकोप्याला तडा जाण्यासाठीच हा प्रकार घडला असावा, त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मराठे यांच्या नेतृत्वाखालील श्रीपाद कुलकर्णी, श्रीराम मराठे, निकम, शिंदे, गोरे, लोहारकर यांनी एका पत्रकान्वये केली आहे. सदरची घटना गांभीर्याने घेण्यात यावी आणि संपूर्ण शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे
बॉम्बसदृश वस्तूचे धागेदोरे मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2016 10:31 PM