येवला : तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांचा चारा व ग्रामीण भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी पालखेड धरणातून रोटेशन द्यावे, अशी मागणी येवला तालुका शेतकरी संघटना व बळीराज्य पाणी वापर सहकारी संस्थांच्या संघाने निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.शेतीला पाणी नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत याचा शासनाने विचार करावा. महानगरपालिका, नगरपालिका संस्थांना एकदाच बंद पाइपलाइनचा खर्च करावा लागणार आहे. त्याची सक्ती करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.धरणामधून होणारा अतिउपसा, मार्गव्यय तूट, शहरातील पाणीवाटपाला थोडा कट लावल्यास शेतकऱ्यांसाठी किमान १००० द. ल. घ. फू.चे रोटेशन देणे शक्य होणार आहे. पाटबंधारे खात्याने या बाबींचा विचार करून तालुक्याला रोटेशन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.जायकवाडी धरणासाठी नाशिक, नगरहून सोडले जाणारे पाणी नदीमार्गाने देण्यात येते. त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. प्रत्यक्षात पैठणमध्ये किती पाणी पोहचते याचा पूर्वानुभव तपासावा. त्याऐवजी रेल्वेमार्गाने टँकर नेणे किंवा अन्य मार्गाचा अवलंब करावा अन्यथा या जिल्ह्यात आंदोलनाचा आगडोंब शासनालाही थांबविता येणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बळीराज्य पाणी वापर सहकारी संस्थांचा संघाचे चेअरमन संतू पा. झांबरे, व्हा. चेअरमन सुरेश कदम, शेतकरी संघटनेचे संध्या पगारे, सुभाष सोनवणे, अरु ण जाधव, अनिस पटेल, बाळासाहेब गायकवाड, सुरेश जेजूरकर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
डाव्या कालव्याचे रोटेशन मिळावे
By admin | Published: October 20, 2015 11:09 PM