येवला : नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्याला पूरपाणी नदीमार्गाने जात असल्याने ‘नाशिक जिल्हा उपाशी, तर मराठवाडा तुपाशी’ अशी संतप्त भावना जिल्ह्यातून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकरी व्यक्त करत असतानाच्या पार्श्वभूमीवर येवल्याचे अॅड. शाहूराजे माणिकराव शिंदे हे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आगामी आठ दिवसात हस्तक्षेप जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठ व मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहेत. १९०५ साली करंजवण व नंतर पालखेड धरण बांधताना नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळत असलेल्या येवला तालुक्यासाठी पाणीवापर गृहीत धरण्यात आला होता. पर्जन्यछायेचा व दुष्काळी प्रदेश गृहीत धरून जिल्ह्यातील धरणे बांधली आहेत. या बाबीचा विचार मराठवाड्याच्या पाण्यासाठी भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत दुर्लक्षित झाला असल्याची भावना येवला तालुकावासीयांची आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाडा व नाशिक पाणीप्रश्नावरून वाद पेटत आहे. मराठवाड्याला पाणी देण्यासाठी विरोध नाही; मात्र नाशिककरांसह येवल्याची तहान अगोदर भागवा, मगच पूरपाण्याचा विसर्ग नदीमार्गे करा, अशी मागणी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून होत आहे. पाणी देण्यावरून सातत्याने संघर्ष होतो. दोन वर्षांपासून समन्यायी पाणीवाटपाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्याला सहन करावा लागत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सिंचन धोक्यात आले आहे. आता न्यायालयाच्या आदेशाने मराठवाड्याला पूरपाणी दिले जात आहे; परंतु येवला तालुका मात्र उपेक्षितच राहत आहे. गेल्या वीस वर्षात प्रथमच आॅगस्ट महिन्यात करंजवण धरण भरले. त्यामुळे येवलेकरांच्या आशा वाढल्या. परंतु पूरपाण्याचा थेंबही अद्यापपावेतो येवल्याला मिळालेला नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असला तरी येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पीकपाणी आले मात्र विहिरी, बंधारे, पाझर तलाव अजूनही कोरडे आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पाण्याची उपलब्धता असली तरी आगामी दिवसांत येवला तालुक्याला पुन्हा दुष्काळाच्या सावटाखाली जाण्याची चिन्हे असतानादेखील पूरपाण्याचा थेंबदेखील येवल्याला मिळू नये ही शोकांतिका आहे. (वार्ताहर)
कालव्यातून विसर्ग करा!
By admin | Published: August 20, 2016 12:16 AM