शहर पोलिसांनी चालू वर्षात मागील सहा महिन्यांत मोक्कांतर्गत १०८ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. यामुळे मोक्काच्या कारवाईचा मागील दहा वर्षांचा रेकॉर्ड माेडीत निघाला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण, तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील खून आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खून व त्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या गुन्ह्यांमधील टोळ्यांसह गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमाफियांच्या टोळीने भूखंड बळकाविण्यासाठी वृद्ध भूधारक मंडलिक यांची निर्घृणपणे केलेल्या हत्येप्रकरणी संशयित सराईत गुन्हेगारांवर पाण्डेय यांनी मोक्काची कारवाई केली.
त्याचप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील एकूण ३३ गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाईसाठी नावे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून सुचविली गेली होती. मात्र, सहा गुन्हेगारांनी बंधपत्र लिहून दिल्याने त्यांना दिलासा देत पाण्डेय यांनी २७ गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाईचे आदेश दिले. मात्र, त्यातील सहा गुन्हेगारांनी गुन्हेगार सुधार मेळाव्यात उपस्थित राहून ‘आम्ही आमचे वर्तन सुधारणार असून, गुन्हेगारीतून बाहेर पडत सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे वागू’ असे बंधपत्र (बॉण्ड) लिहून दिल्याने त्यांना मोक्काच्या कारवाईतून ‘क्लीन चिट’ दिली गेली.
--इन्फो--
या गुन्हेगारांना ‘क्लीन चिट’
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील मोक्काच्या कारवाईच्या यादीमधील आकाश विलास जाधव (२४, रा.पंचवटी), श्रीनिवास सुरेंद्र कानडे (२८, रा. कॉलेज रोड), किरण दिनेश नागरे (३८, रा.मखमलाबाद रोड), अजय दिलीप बागूल (३४, रामवाडी), पवन शिवाजी कातकाडे (३४, राणेनगर), रोहित आनंद उघाडे (२९, रा.सिडको) यांना चांगले नागरिक बनण्याची शेवटची संधी पोलिसांनी बंधपत्र लिहून घेत दिली आहे. या सहा युवकांनी यापुढे शहरात कोठडीत कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करीत कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.