नाशिक : प्रशासनाकडून साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या साधू-महंतांसाठी रास्त धान्य दुकानाच्या माध्यमातून रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने आखाडे व खालशांसाठी रेशनच्या मागणीसाठी पाठविण्यात आलेल्या अर्जात एका साधूसाठी महिन्याला दोन किलो तांदूळ, अर्धा किलो साखर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आखाड्यातील साधू-महंतांची महिनाभराची भूक यावर भागणार कशी? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात आखाड्यांत भाविक, साधंूची गर्दी होत असते. भाविकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आखाड्यांमध्ये होत असतो. सध्या मिळणाऱ्या या रेशनवर महंतांना महिन्याभराची भूक भागवावी लागणार आहे. त्यात आखाड्यांत येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद व भंडारा कसा करणार? असा प्रश्न गौस्वामी तुलसीदास खालशाचे व्यवस्थापक रामानुजदास महाराज यांनी उपस्थित केला आहे. तसेच प्रशासनाकडून रास्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या गहू, तांदूळ, साखरेचे दर जास्त आहेत. प्रयागमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात जे दर होते त्याच दरात रेशन मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे. साखर अत्यल्प मिळणार आहे. एका महिन्याभरासाठी ५०० ग्रॅम साखर म्हणजे प्रशासन साधू- महंतांची चेष्टा करीत असल्याचे रामानुजदास महाराज यांनी सांगितले. आखाड्यात येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून गोड पदार्थ द्यावे लागणार आहे. एका साधूला महिन्याला अर्धा किलो साखर मिळणार आहे. त्यामुळे साधू-महंतांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गहू ७ रुपये २० पैसे प्रतिकिलो, तर तांदूळ ९ रुपये ६० पैसे प्रतिकिलो मिळणार आहे. एका साधूसाठी प्रति महिना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देण्यात येणार आहे. त्यावर साधू-महंतांना महिन्याभराचे नियोजन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)साधुग्राममध्ये उभारण्यात आलेल्या रास्त धान्य दुकानाच्या फलकावर २१ रुपये किलो साखरेच्या दरांची नोंद आहे. मात्र होलसेलमध्ये साखरेचे दर २१ ते २२ रुपये प्रतिकिलो आहेत. होलसेल विक्रेत्यांकडून त्याचदरात साखर मिळत असेल तर प्रशासनाच्या रास्त धान्य दुकानातून साखर कशासाठी घ्यायची? - महंत अवधबिहारीदास, गौस्वामी तुलसीदास खालसा, अयोध्या
दोन किलो तांदूळ, अर्धा किलो साखरेत भागवा!
By admin | Published: August 04, 2015 10:45 PM