नाशिक - माझ्या एकूण ५२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीपैकी २७ वर्षे मी विरोधी पक्षात राहिलो आहे. विरोधी पक्षात राहून काम समाधान मिळते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले. ''- माझ्या एकूण ५२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीपैकी २७ वर्षे मी विरोधी पक्षात राहिलो आहे. विरोधी पक्षात राहून काम केल्यावर एक वेगळेच समाधान मिळते.'' येत्या आठवडाभरात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुका जाहीर होतील, तसेच दिवाळीपूर्वी राज्यातील मतदान होईल, अशी शक्यताही शरद पवार यांनी वर्तवली. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले. ''राज्यातील विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप एकत्र लढणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२५ जागांवर लढणार असून, मित्रपक्षांना ३८ जागा सोडण्यात येतील,'' असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच जागावाटप झाल्यानंतर नागपूर, नाशिक आणि मुंबईत जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही शरद पवार यांनी यावेळी केली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याशी आपले कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करताना आजच्या नाशिकमधील कार्यक्रमाची आखणी भुजबळ यांनीच केल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या उदयनराजेंवर त्यांनी टीका केली. अन्याय झाल्याची जाणीव व्हायला उदयनराजेंना १५ वर्षे का लागलीत, अशी विचारणा त्यांनी केली.
विरोधी पक्षात काम केल्यावर समाधान मिळतं - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 3:54 PM