नाशिक : जिल्हा रुग्णालयात हिंगोली येथून आलेल्या एका इसमाकडे काही महिन्यांचे माकडाचे पिलू साखळीने दुचाकीला बांधल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार पश्चिम वनविभाग कार्यालयातील वनरक्षकांनी माकडाच्या पिलाची सुटका केली.हिंगोली येथून आलेल्या एका इसमाने नर जातीचे दोन वर्षांचे पिलू तीन महिन्यांपासून पाळले होते; मात्र वन्यप्राणी संरक्षण कायद्यांतर्गत अशा प्राण्याला पाळता येत नाही. त्यामुळे वनविभागाचे वनरक्षक उत्तम पाटील, शरद थोरात यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन पोलीस चौकीसमोर उभ्या असलेल्या दुचाकीवरील (एमएच ३०, एके ७०३३) माकडाची सुटका करत ते ताब्यात घेतले. सदर माकड लाल तोंडाचे असून त्याला त्र्यंबकेश्वर, अंजनेरी या भागात नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, पाटील व थोरात यांनी पोलीस चौकीसमोर माकडाला बघण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीला ही वन्यप्राणी संरक्षण कायद्याची माहिती सांगितली. या कायद्यान्वये वन्यप्राणी-पक्षी माणसाला पाळता येत नाही. सदर कायद्यान्वये संरक्षित असलेले प्राणी, पक्षी कोणाकडे आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून असे वन्यप्राणी कोणाकडे आढळून आल्यास वनविभागाशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
माकडाची साखळीतून सुटका
By admin | Published: February 21, 2016 10:51 PM