गावठाण भागातील रस्त्यांची कामे करतानाच भुयारी गटार आणि पावसाळी गटारीची कामे देखील करणे हे अंतर्भूत आहे. परंतु त्यानंतर आता पथदिप देखील बसवण्याचे काम सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेने अत्यंत चांगले पथदिप बसवले आहेत. मात्र, ते पोल हटवून पुन्हा नवीन पोल बसवण्याचे काम सुरू आहे. काढलेले पोल कोठे आहेत, हे महापालिकेला आणि कंपनीला सांगता येत नाही.
महापालिकेने यासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात शहरातील काही भागात वर्षभरापूर्वीच पोल बसवलेले असतानाही त्याठिकाणी पुन्हा नवीन पोल बसविल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. जीपीओ ते महाकवी कालिदास कला मंदिर मार्गावर पोल शेजारी पुन्हा पोल बसवण्यात आले आहेत. पंचवटीत आदर्श नगर म्हणजेच उपमहापौर भिकूबाई बागूल यांच्या निवासस्थानासमोर वर्षभरापूर्वीच पथदिप बसवण्यात आले असून तेथील पाेल बदलण्यात आले आहेत. अशाच प्रकारे गंगापूररोडवर मॅरेथॉन चौक ते रावसाहेब थोरात हॉल समोरील मार्गावर देखील रस्त्यावरील पोल असताना पुन्हा नव्याने समोरासमोर पोल लावण्यात आले आहेत. अशाच प्रकारे अशोक स्तंभ ते रामवाडी पुलावर देखील परस्पर पोल टाकण्यात आले असून त्याच्या केबलचे काम पूर्ण न केल्याने अपघात हेाण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने नमूद केले होते.
इन्फो...
कामात तरतूद नसतानाही बसवले पोल.
उपमहापौर भिकूबाई बागूल यांचे निवासस्थान असलेल्या रामवाडीतील आदर्श नगरात स्मार्ट सिटीच्या वतीने रस्त्याचे जे काम सुरू आहे त्यात पथदिपांचा कोणताही प्रस्तावच नाही. मात्र, तरीही त्याठिकाणी पोल बदलण्यात आल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे कंपनीत अंधाधुंद कारभार सुरू असल्याचे दिसत आहे.