सोयगाव : मागील आठवडाभरात मालेगाव महानगरातील सर्व शिक्षा अभियानच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी मनपाच्या विविध शाळांना भेटी देऊन शाळा बंद करण्याबाबत धमकावण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे शिक्षक व पालक वर्गात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
शासनाच्या परिपत्रक दिनांक ५ जुलै व १० ऑगस्ट २०२१ नुसार शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग व ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्ग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परिपत्रकातील अटी व शर्तीनुसार सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे शासनाचे आदेश असताना, महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियानाचे काही कर्मचारी शहरातील विविध शाळांना अचानक भेट देत असून शाळा बंद करण्याबाबत मुख्याध्यापकांना धमकावत आहेत. यासंदर्भात माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आर. डी. निकम व पदाधिकाऱ्यांनी गुरुवार, शुक्रवार व शनिवारी महानगरपालिकेच्या आयुक्त, उपायुक्त यांना यासंदर्भात भेटण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे मनपाचे प्रशासन अधिकारी फ्रान्सिस चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी कर्मचाऱ्यांना आपण शाळा सुरू आहेत किंवा बंद आहेत, या संदर्भात बघायला सांगितले होते. त्यांना शाळा बंद करण्याबाबत सांगितले नव्हते, असे स्पष्ट केले. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व एम.आय.एम.च्या काही नगरसेवकांनी धारेवर धरत मनपा शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
शुक्रवारी (दि. १७) मालेगाव गर्ल्स हायस्कूलला आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना शाळा बंद करण्यास सांगितल्याने शाळेत प्रचंड घबराट निर्माण झाली. शाळेत प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ तसेच पोलीस प्रशासनाशी संपर्क केला. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली असता, त्यांनी आपण अशा प्रकारचे कुठलेही आदेश दिले नसल्याचे सांगितले.
इन्फो
मनपा आयुक्तांना निवेदन
मालेगाव गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक लियाकत यांनी सांगितले की, पोलीस व मनपाचे प्रशासन अधिकारी, कर्मचारी आमच्या शाळेत येऊन वारंवार शालेय कामकाजात व्यत्यय निर्माण करत आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी व मनपा आयुक्तांनी तत्काळ दखल घेऊन शासन निर्णयाप्रमाणे योग्य ते आदेश काढावेत, अशी मागणी करण्यात आलेली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. २०) संघटनेचे पदाधिकारी यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहमद, राज्य उपाध्यक्ष आर. डी. निकम, तालुकाध्यक्ष निंबा बोरसे, जहीर हुसेन, फयाज, शाहिद, नईमुररहमान, शफीक, एजाज नासीर, निजाम, जलीसुरहमान, शंकर खैरनार, जयेश सावंत, शिदीक भाई, उबेदूररहमान आदी उपस्थित होते.
कोट...
खबरदारी घेऊन शाळा चालू करण्याचे परिपत्रक शासनाने काढलेले असून, मालेगावातील मनपा कर्मचारी हकनाक शाळा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भासते. मुलांचे शिक्षण त्यांच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असून, मालेगावातील शाळा पूर्ण काळजी घेऊन शिक्षण देत असताना मनपाने शाळा बंद पाडण्याचा घाट का घातला?
- आर. डी. निकम, राज्य उपाध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ
फोटो- २० मालेगाव स्कूल
200921\300520nsk_58_20092021_13.jpg
फोटो- २० मालेगाव स्कूल