नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेचे महसुली क्षेत्र हे पूर्वीच्या ग्रामपालिकेइतकेच असणार आहे. यात ओझरमधील गट क्र. १ ते २७३१ तर बाणगंगानगर गावातील गट क्र. १ ते १७६चा समावेश करण्यात आलेला आहे. सुरुवातीच्या काळात रचना, विविध पातळीवरील असलेल्या अंमलबजावणी, उपाययोजनेसाठी तहसीलदार यांना अधिकार देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्यपद गेले.
ग्रामपालिका हे ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषदेच्या अखत्यारित काम करत असल्याने तेथे गटासाठी एक जिल्हा परिषद सदस्य तर गणांसाठी दोन पंचायत समिती सदस्य निवडून दिलेले असतात. परंतु आता नगर परिषद अंमलात आल्याने व ते नगरविकास विभागाच्या अधिपत्याखाली येत असल्याने येथील जिल्हा परिषद सदस्य यांना त्यांचे म्हणणे मांडू दिल्यानंतर शासनाने ओझर गटाचे सदस्य यतीन कदम तसेच पंचायत समिती सदस्य नितीन पवार व नितीन जाधव यांना पदावरून १८ रोजीपासून दूर केल्याचे उपसचिव लहुराज माळी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
ओझरचे वातावरण ढवळून निघणार
गावाचा वाढता विस्तार व लोकसंख्या बघता येथील पूर्तता कधीच झाल्याचे लक्षात आले. नुकत्याच झालेल्या ग्रामपालिका निवडणुकीत माजी आमदार अनिल कदम हे नगर परिषद येणार म्हणून ठाम होते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत माघार घेतली. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले तर दुसरीकडे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्या गटाने नगर परिषदेचे स्वागत करीत निवडणूक लढवली, परंतु सदर ग्रामपालिका ही औटघटकेची ठरली आणि सरपंच व उपसरपंच बसण्यापूर्वीच तहसीलदार यांनी प्रशासक म्हणून गावगाडा हातात घेतला. आगामी ओझर नगर परिषद निवडणुकीसाठी आताच मोर्चेबांधणी सुरू झाली असून प्रभाग रचनेनंतर खरी रंगत येणार आहे.