पुरुषोत्तम राठोडघोटी : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेला बैलबाजार बंद असल्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली असून, व्यापारी, शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलबाजार भरतो. त्याला ४० वर्षांची परंपरा आहे. कधीही बंद न राहणारा बैलबाजार एवढ्या वर्षात पहिल्यांदा कोरोनाच्या संकटाने बंद ठेवण्याची वेळ आली. वर्षभरापासून ठप्प असलेल्या बाजारातील होणारी कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. शासनाने त्वरित बाजार सुरू करावा, अशी मागणी होत आहे.नाशिक, नगर, ठाणे , पालघर या चार जिल्ह्यांतील डांगी, खिल्लारी जनावरांचा घोटी हा मुख्य बाजार असून, या ठिकाणी येणारे बैल हे उत्कृष्ट स्वरूपाचे असतात अशी ख्याती आहे. या ठिकाणी आठवडी बाजार शनिवार रोजी भरत असतो. एका दिवसात ३०० ते ४०० जनावरांची खरेदी-विक्री दिवसाला होत असते. या बाजारात एका दिवसाला २० लाखांवर उलाढाल होते.
महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारा बाजार गत वर्षभरापासून ठप्प झाला आहे. सद्य:स्थितीत बैल बाजार बंद असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बैलांचे व्यवहार सुरू आहेत. व्यापाऱ्यांची बैलांची शोधाशोध करून गिऱ्हाईक बघण्यात दमछाक होत आहे. मागणी अधिक असूनसुद्धा व्यापार होत नसल्याने बैल व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या बैल बाजारासाठी इगतपुरी, त्र्यंबक, खोडाळा, मोखाडासह, नगर जिल्ह्यातील राजूर, अकोले, ठाणगाव - पाडळी, पालघर व ठाणे जिल्ह्यात बैलांचा बाजार नसल्याने घोटी बाजारातूनच खरेदी - विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. शेताच्या बांधावर जाऊन बैलांच्या विक्री सुरू असून, लवकरात लवकर बैल बाजार सुरू करावा, अशी मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांकडून होत आहे.---------------------घोटी येथील बैलबाजार चार जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध असून, बैलबाजार शासनाने त्वरित सुरू करावे. लॉकडाऊननंतर शासनाने सर्वच बाबी सुरू केल्या असून, बैलबाजार अजूनपर्यंत बंद का ठेवण्यात आला. हा संशोधनाचा विषय आहे. बैलबाजार बंद असल्याने शेतकरी व व्यापारी दोघांचे अतोनात नुकसान होत आहे. ठप्प झालेली उलाढाल सुरळीत करण्यासाठी बैलबाजार त्वरित सुरू केल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार नाही.- भरत आरोटे, शेतकरीवर्षभरापासून घोटी येथील बैलबाजार ठप्प असल्याने आमचे व्यापार अक्षरशः ठप्प झाले आहेत. बंद व्यापारामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बैलांची खरेदी सुरू आहे. परंतु खरेदी - विक्रीसाठी गिऱ्हाईक शोधण्यासाठी कसरत करावी लागत आहे. लवकरात लवकर शासनाने बाजार सुरू करावा अन्यथा गरीब शेतकरी व व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे.- अनिल गतीर ( व्यापारी)