घोटी : येथील समृद्धी ट्रेडर्स या भगर उत्पादक मिलला बुधवारी (दि. ३०) सकाळी अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. या आगीने रौद्र स्वरूप धारण केल्याने भगरीच्या उत्पादनासह मशिनरीही जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
घोटी संताजी नगर परिसरात असलेल्या समृद्धी ट्रेडर्स या भगर उत्पादक मिलला अचानक आग लागल्याचे लक्षात आले. व्यापारी संकेत गांधी यांच्या मालकीच्या या भगर मिलमधील मशिनरीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान आग लागून तयार झालेली भगर, भगरचा कच्चा माल (कोदरा), एवेलेटर, पोलिशर आदी मशिनरीसह अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाले.आगीचे वृत्त समजताच इगतपुरी येथील महेंद्र कंपनी तसेच मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व त्यांनी आग आटोक्यात आणली. नेहमीप्रमाणे घोटी टोल नाक्याचे अग्निशामक वाहन नादुरुस्त असल्याने काही एक उपयोग झाला नाही. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अनेक सामाजिक, राजकीय, तसेच व्यापार क्षेत्रातील नागरिकांनी गर्दी केली, अनेक भगरीचे कट्टे जळून भस्मसात झाले होते. यंत्रणेकडून उशिरापर्यंत पंचनामे करण्याचे काम सुरू होते.