घोटी : येथे श्री शिवपुराण ज्ञानयज्ञात शनिवारी ब्रह्माजींनी नारद यांना शिवपुराण सांगण्यास सुरुवात केली. त्याआधी शिवमाहात्म्य तथा विश्वरूप दर्शनाचे अंश आगळ्यावेगळ्या रूपात श्रोत्यांसमोर मांडताना गिरीबापू यांच्या सुमधुर वाणीने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. नारद यांना ब्रह्मदेवांनी महादेव विश्वरूपाचा अर्थ विस्तृत करून सांगण्यास सुरुवात केली. सृष्टीच्या निर्मितीआधी विराट रूपाचे वर्णन ब्रह्माजींनी कथन केले. शिवपुराण श्रवणाआधी शिवची व्याप्ती व त्यांच्या विश्वरूपास जाणून घेणे गरजेचे असल्याचे ब्रह्मांनी नारद यांना सांगितले. महादेव हे विश्वस्वरूप, विश्वनाथ, विश्वपती आहेत. त्यांचे अष्टरूप दर्शन म्हणजेच विश्वरूप होय. या संपूर्ण सृष्टीवर ज्या गोष्टींचे अस्तित्व आहे त्या सर्वांचा अंश म्हणजेच महादेव होय. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, आत्मा, सूर्य, चंद्र हे अष्टरूप महादेवाचे आहेत. जगात हनुमान व महादेव यांना पंचमुखी संबोधले जाते. अशा पंचमुखी महादेवांची वंदना ब्रह्माजींनी नारद यांना करावयास सांगितली. सर्व देवांचे देव महादेवास वंदन केल्यास सर्व देवी-देवता, नक्षत्र तथा ब्रह्मांडाचे पूजन करण्याचे पुण्य लाभते. भगवान शंकराचे रौद्र रूप जरी असले तरी सर्वात कोमल हृदयी, भोळे असून, लवकर प्रसन्न होत असल्याचे सांगितले. पृथ्वीतलावर हजारो अवतार शिवरूपातूनच झाले आहेत. विष्णू व शिव हे एकच असून, ३३ कोटी देवतांचा वास असणाऱ्या गोमातेचे माहात्म्यसुद्धा अगाध आहे. गाईच्या दुधानेच शिवलिंगाची पूजन केले जाते. सूर्योदयापूर्वी व सूर्यास्ता आधीचेच गायीचे दूध अभिषेकाकरिता चालू शकते. वासरू तृप्त झाल्यानंतरच उर्वरित दुधाचा अभिषेक होऊ शकतो. अशा विविध पूजनांचे वर्णन ब्रह्माजींनी नारद यांना सांगितल्याचे गिरीबापूंनी सांगितले.
घोटीत साकारले महादेवाचे विश्वस्वरूप दर्शन
By admin | Published: November 28, 2015 11:03 PM