नाशिक : राष्ट्रीय सेवक स्वयंसेवक संघाच्या वतीने नाशिक शहरात विविध ८० ठिकाणी पथ संचलन करण्यात आले. त्यापैकी इंदिरानगर येथे झालेल्या पथ संचलनात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेत परिसरातून पथ संचलन केले. मंत्री महोदय संचलनात सहभागी झाल्याने त्यांना पाहण्यासाठी परिसरात गर्दीदेखील झाली होती. विजयादशमीच्या निमित्ताने मोदकेश्वरनगर, इंदिरानगर गटाच्या वतीने परिसरातून सघोष पथ संचलन करण्यात आले. ग्रामविकासमंत्री महाजन हे बोधी वृक्ष फांदीरोपण महोत्सवासाठी नाशिकमध्ये आले होते.
सोमवारी रात्रीपासूनच ते नाशिक मुक्कामी होते. मंगळवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन हे संघाच्या पारंपरिक गणवेशात पथ संचलनात सहभागी झाले. मंत्री महोदय स्वत: सहभागी झाल्याचे परिसरात समजल्यानंतर त्यांना पाहण्यासाठीदेखील रस्त्यावर काही प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव, ॲड. अजिंक्य साने, योगेश शिंदे, रोहित गायधनी, दिनेश देशमुख, अनिरुद्ध जोशी, श्रीकांत बर्वे आदींसह सहस्वयंसेवक सहभागी झाले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून रमाबाई आंबेडकर शाळा संस्था विश्वस्त व शालेय समितीचे अध्यक्ष गोविंदराव कटारे कटयारे होते. राष्ट्रीय सेवक स्वयंसेवक संघाच्या मोदकेश्वरनगर, इंदिरानगर गटाच्या वतीने सकाळी सव्वा सात वाजता इंदिरानगर येथील सिटी गार्डन येथून संचलनाला सुरुवात झाली. उद्यान कॉलनी, वंदना पार्क, श्री जयनगर, साती आसरा देवी मंदिर, साईनाथनगर चौफुली, पंचमुखी हनुमान मंदिर विनयनगर, दीपालीनगर सिद्धिविनायक मंदिर, कौशल्येश्वर महादेव मंदिर, जॉगिंग ट्रॅक मार्गे काढण्यात आली होती.