लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतीय जनता पक्षाच्या शेवटच्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा समारोप येत्या १९ सप्टेंबर रोजी नाशिकमधील तपोवनात होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, या समारोप यात्रेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी पालकमंत्री महाजन यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, आमदार बाळासाहेब सानप व महापालिका अधिकारी यांच्यासमवेत तपोवनातील जागेची पाहणी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या शेवटच्या टप्प्याचा समारोप नाशिक येथे करण्यात येणार आहे. समारोप यात्रेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून, त्यांची जाहीर सभा होणार असल्याने सभेला आवश्यक तेवढी मोकळी जागा तपोवनात उपलब्ध असल्याने सदर जागेची पाहणी करण्यात आली आहे. सभेला तीन लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली आहे.मोदींच्या उपस्थित होणाऱ्या सभेसाठी व्यासपिठ उभारणी कोठे असेल, वाहनतळाची व्यवस्था, साउंड व्यवस्था, सभेसाठी येणाºया नागरिकांना प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग याबाबत पालकमंत्र्यांनी उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सभास्थळी पावसामुळे गााजरगवत वाढले असून, त्याची स्वच्छता करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. सुमारे अर्धा तास चाललेल्या पाहणी दौºयात आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, महापौर रंजन भानसी, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता सतीश सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक गणेश गिते, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, महापालिका शहर अभियंता संजय घुगे, प्रभारी विभागीय अधिकारी आर. एस. पाटील, सी.बी. अहेर, उद्यान विभागाचे वसंत ढुमसे, आडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर मोरे आदींसह मनपा तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते.