नाशिक : जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात गत पाच वर्षात समाधानकारक वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमामुंळे तसेच गर्भलिंग निदानबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसह जनजागृतीमुळेच ते शक्य झाले आहे. सध्या सरासरी १००० मुलांमागे मुलींचा जन्मदर ९५१ इतका असला तरी प्रत्यक्षात मुलींच्या जन्माचे गुणोत्तर समान पातळीवर आणणे अद्यापही शक्य झालेले नाही. त्यामुळे अजूनही वंशाला दिवा हवाच, हा अट्टहास कायम असल्याचेच दिसून येते.
जिल्ह्यासह राज्यभरातही मागील चार वर्षांपूर्वी मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणात घसरला होता. पाच वर्षांपूर्वी मुलींचा जन्मदर अत्यंत कमी असलेल्या देशभरातील १०० जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश होता. त्यानंतर गर्भलिंगनिदान करणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्याने त्याबाबत एक वचक निर्माण झाला. कमी जन्मदर असल्याची कारणे शोधण्यासाठी, अनधिकृत गर्भपातासारखे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. गत दोन वर्षांपासून आरोग्य यंत्रणा कोरोनाशी सामना करण्यात व्यस्त असली तरी या गंभीर प्रकारांकडे दुर्लक्ष झालेले नसल्याचे उपलब्ध आकडेवारीतून निदर्शनास येत आहे. मात्र, शासनाचा उद्देश एक हजार मुलांमागे ९९४ मुली असा असल्याने अद्याप निश्चित उद्दिष्ट गाठता आलेले नाही, हेच वास्तव आहे.
जिल्ह्याची सरासरी ९५१
राज्यातील मुलींचा जन्मदर राज्यात २०१३ मध्ये मुलींच्या जन्माचे लिंगप्रमाण एक हजार मुलांमागे फक्त ९०० होते. २०१६ मध्ये जिल्ह्यात हे प्रमाण सरासरी हजार मुलांमागे ९१३ तर २०१७ मध्ये ९२५ एवढाच मुलींचा जन्मदर होता. दरम्यान कोरोनापूर्वी म्हणजे २०१९ या वर्षी एक हजार मुलांमागे ९३० मुलींची संख्या नोंदविण्यात आली आहे. उपाययोजनांनी वाढ झाल्यानंतर २०२० मध्ये जिल्ह्यात मुलींचा जन्मदर १ हजार मुलांमागे ९६१ इतका होता.
पेठ तालुका सर्वोत्तम
जिल्ह्यात मुलींचा सर्वाधिक जन्मदर हा आदिवासी पेठ तालुक्यात तब्बल १ हजार मुलांमागे १०७६ इतका आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर चांदवड तालुक्यात ९८५ इतके तर कळवण तालुक्यात ९७५ इतके सरासरी प्रमाण आहे.
येवला तालुक्यात सर्वात कमी
जिल्ह्यात सर्वात कमी जन्मदराचे प्रमाण हे येवला तालुक्यात अवघे ९०० इतके आहे. दिंडोरी तालुक्यातही अवघे ९०२ इतकेच हे प्रमाण असून नाशिक तालुक्यात ९३३ तर देवळा तालुक्यात ९३६ असे हे जन्मदराचे प्रमाण असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.