नाशिक : मंगळवारी दुपारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सावतानगरमधील ‘त्या’ घरात आगळ्या आनंदोत्सवाला सुरुवात झाली... या घरातील दहावीचे दोन विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते... या दोन विद्यार्थ्यांपैकी एक होती आई अन् दुसरी होती तिचीच मुलगी! मुलीसोबत आईनेही दहावीच्या परीक्षेत एकाच वेळी बाजी मारण्याची दुर्मीळ घटना घडताना पाहून या घरालाही बहुधा या कुटुंबाच्या ज्ञानलालसेचा अभिमान वाटला असावा. सावतानगर येथील मनीषा संजय अहिरे (वाघ) आणि त्यांची मुलगी कादंबरी यांच्या यशाची ही गोष्ट. लवकर विवाह झाल्याने शिक्षण अपूर्ण राहिलेल्या मनीषा यांनी आपल्या मुलीकडून प्रेरणा घेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या रात्रशाळेत दहावीला प्रवेश घेतला. घरातल्या कामांची जबाबदारी पेलून अभ्यास केला. आई व मुलीने एकाच वेळी दहावीची परीक्षा दिली. आईला ६६ टक्के गुण मिळाले, तर मुलगी ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. सन १९९८ मध्ये इलेक्ट्रीशियन असलेल्या संजय अहिरे यांच्याशी मनीषा यांचा विवाह झाला. या दांपत्याला कादंबरी व प्रथमेश अशी दोन अपत्ये. विवाह झाल्याने मनीषा यांना इच्छा असूनही पुढे शिकता आले नाही. गेल्या वर्षी मुलगी कादंबरी सावतानगरच्या लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयात दहावीला गेल्यावर तिने आईला दहावीत प्रवेश घेण्यास प्रवृत्त केले. यातच मनीषा यांना अशोकस्तंभ येथील रात्रशाळेची माहिती मिळाली. त्यांनी पतीकडे शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा प्रगट केली. त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर अन्य कोठेही वाच्यता न करता मनीषा यांनी सायंकाळी ७ ते १० या वेळेत शाळेत जाण्यास सुरुवात केली. घरातली सगळी कामे सांभाळून अभ्यास केला. मुलीकडूनही अभ्यास करवून घेतला. परीक्षा काळात तर त्यांना प्रचंड कसरत करावी लागली. मनीषा यांचे परीक्षा केंद्र अशोकस्तंभावर, तर कादंबरीचे सावतानगरला. त्यामुळे मुलीची सर्व तयारी करून देऊन मनीषा परीक्षेसाठी आपल्या मुलीच्या अर्धा तास आधी घराबाहेर पडत. आपल्याला फार तर पन्नास टक्के गुण मिळतील, असे मनीषा यांना वाटत होते. निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र ६६ टक्के गुण पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता मनीषा थेट बारावीला प्रवेश घेणार असून, शिकून कुटुंबाला हातभार लावण्याचा त्यांचा मनोदय आहे. (प्रतिनिधी)
मुलीबरोबर आईनेही मारली बाजी!
By admin | Published: June 18, 2014 1:08 AM