नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे अठरा वर्षीय युवतीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.८) रात्री घडली. चिंचोली गावातून भगूरकडे जाणाऱ्या झाडे मळ्यात भाऊसाहेब झाडे यांची वस्ती आहे. भाऊसाहेब झाडे यांचे कुटुंब बुधवारी रात्री जेवण करून झोपले होते. मात्र, मध्यरात्री तीनच्या सुमारास कुटुंबातील सदस्य लघुशंकेस उठले असता आरती दिसून आली नाही. मात्र, ती लघुशंकेस गेली असेल असे समजून तेही झोपी गेले. मात्र, सकाळी कुटुंब उठल्यावर आरती दिसून येत नसल्याचे लक्षात आले. झाडे यांच्या कुटुंबीयांनी शेजारील शिवारात शोधले. मात्र, आरती कोठेच आढळून आली नाही. यावेळी शेजारील शांताराम काशीनाथ कुंटे यांच्या गट नंबर ४४४ मधील घरातील लोकांनी शोध घेतला. सकाळी ८ वाजता घराच्या पाठीमागे २०० फूट अंतरावर विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला. घरातील माणसांनी पोलीस पाटील मोहन सांगळे यांना कळविले. पोलीस पाटील सांगळे यांनी जागेवर जाऊन खात्री करून सिन्नर पोलीस स्टेशनला फोन वरून दिली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पोलीस कर्मचारी रामदास जाधव, बाबा पगारे यांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. सिन्नर येथे सरकारी दवाखान्यात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. दुपारी चिंचोली येथे अंतिम संस्कार करण्यात आले.