- अझहर शेख
नाशिक : वनपरिक्षेत्रातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या धुमोडी गावात बिबट्याने सोमवारी (दि.4) संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास एका शाळकरी मुलीवर हल्ला चढविला. जबड्यात धरून बिबट्या मुलीला जंगलात घेऊन गेला. सुमारे साडे चार तास वनकर्मचारी व गावकऱ्यांनी परिसर पिंजून काढला असता रात्री 11 वाजेच्या सुमारास गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडोऱ्यात बलिकेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या हल्ल्याने गावात घबराट पसरली आहे. वनविभागाच्या नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे धुमोडी गावाच्या शिवारात असलेल्या वाघ कुटुंबियांच्या घराच्या अंगणातून रुची एकनाथ वाघ (८) हिला बिबट्या जबड्यात धरून वेगात संध्याकाळी सात वाजता जंगलात पळाला. बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचे समजताच गावकऱ्यांनी त्याच्या पाठीमागे धाव घेतली. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र आधिकारी विवेक भदाणे हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. अंजनेरी, मुळेगावसह नाशिकचे वन कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त पथकाला घटनास्थळी त्यांनी पाचारण केले. वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांनी सुमारे चार ते साडे चार तास शोध घेतला.
हातात बॅटरी घेऊन सर्वत्र बलिकेचा शोध घेतला जात होता मात्र अंधार असल्याने बालिका आढळून येत न्हवती अखेर 11 वाजता बलिकेचा शव गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडाझुडुपांमध्ये पडलेले दिसून आले. वन कर्मचाऱ्यांनी शव ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविले. या घटनेने संपूर्ण धुमोडी पंचक्रोशीत दहशत पसरली असून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बिबट्याच्या प्रवण क्षेत्रात वनखात्याकडून रात्रीच पिंजरे तैनात करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या.