नाशिक : नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास घरातून जॉगींगसाठी बाहेर पडलेल्या एका २२वर्षीय युवतीचा घंटागाडीच्याट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास सातपुर औद्योगिक वसाहतीत घडली. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी दोघा ट्रॅक्टरचालकांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कामगारनगर येथील आनंदनिकेतन शाळेजवळ राहणारी रोशनी केदारनाथ जयस्वाल ही युवती उज्जवल डोंगरे याच्यासोबत जॉगींग करण्यासाठी गुरुवारी सकाळी घराबाहेर पडली. ग्लेनमार्क रस्तयावरुन रोशनी व उज्ज्वल हे मागेपुढे धावत असताना याचवेळी त्यांच्याशेजारुन एका नादुरूस्त ट्रॅक्टर-ट्रॉली घंटागाडीला टोइंग करुन दुसरी ट्रॅक्टर घंटागाडी मार्गस्थ होत होती.
दरम्यान, चालकांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अविचाराने वाहन चालविल्यामुळे रोशनीला मागील घंटागाडी ट्रॉलीचा जोरदार फटका बसला आणि ती धावताना रस्त्यावर कोसळली. ही बाब घंटागाडी ट्रॅक्टरच्या चालकांच्या लक्षात वेळीच आली नाही, यामुळे त्यांनी घंटागाडीला ब्रेक न लावल्याने रोशनीच्या अंगावरुन ट्रॉलीचे मागील चाक गेले. तीच्या डोक्याला जबर मार लागल्याने अतीरक्तस्त्राव होऊन ती मृत्यूमुखी पडली.
याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित ट्रॅक्टरचालक बाबुल श्यामराव विटेकर (२७), अशोक संतु नेटावटे (४०) यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेने पाईपलाइनरोडवरील कामगारनगर भागात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक राठोड हे करीत आहेत.