नाशिक : ‘पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय सुरक्षा बलाच्या वाहनावर हल्ला केला तेव्हापासून खरे तर आमचे लक्ष लागत नव्हते. कारण २४ जानेवारी रोजीच गुवाहाटीहून निनादची श्रीनगर एअर फोर्सला बदली झाली व तो रूजूही झाला होता. सीमेवरील सद्य:स्थिती पाहता त्याला त्याच्या मुलीचा लखनौ येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी मिळणार नसल्याचे माहीत असल्याने आम्ही पंधरा दिवसांपूर्वीच लखनौ येथे आलो. दोन दिवसांपासून भारत-पाकिस्तानातील तणावाचे संबंध व त्यात भारताने एअर स्ट्राइक केल्याचे प्रसिद्धी माध्यमातून दिसत होते. मंगळवारी सायंकाळीच निनादचा नेहमीसारखा फोन आला. हाय, हॅलो झाले, कसा काय आहेस म्हणून विचारल्यावर तो आनंदातच होता; परंतु दुपारी दोन वाजता एअर फोर्स अधिकाऱ्यांचा फोन येताच, काळजात धडधड वाढली आणि नको ती बातमी ऐकायला मिळाली....’ स्कॉडन लीडर निनाद यांचे वडील अनिल रघुनाथ मांडवगणे दाटल्या कंठाने बोलत होते.२१ मे १९८६ मध्ये डोंबिवलीत जन्मलेले निनाद यांना लहानपणापासूनच लष्कराविषयी आकर्षण असल्यामुळे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत त्यांनी हिंदू भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व संस्थेत (एसपीआय) अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नॅशनल डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये भरती होण्यापूर्वी त्यांनी पुन्हा नाशिकला चिंचोली शिवारातील सर विश्वेश्वरय्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले व सन २००९ मध्ये ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले. सन २०१३ मध्ये लखनौ येथील विजेता तिवारी हिच्याशी निनाद यांचा विवाह झाला. आज त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. पाच दिवसांपूर्वीच निनाद यांच्या अनुपस्थितीत तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.जानेवारीत पंधरा दिवस नाशकात मुक्कामएअर फोर्सच्या नोकरीमुळे निनाद यांची कायमच देशाच्या विविध सैनिकी तळांवर नेमणूक असायची. काही वर्षे गुवाहाटी येथील एअर फोर्समध्ये नोकरी केल्यानंतर जानेवारी महिन्यातच त्यांची श्रीनगर येथे बदली झाली. श्रीनगरला जॉइन होण्यापूर्वी ते आई-वडिलांच्या भेटीसाठी सपत्नीक आले होते. साधारणत: पंधरा ते वीस दिवस नाशकात कुटुंबासह आनंदात घालवून ते श्रीनगरला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांची पत्नी विजेता यांना लखनौ येथे सोडले व २४ जानेवारी रोजी श्रीनगरला रूजू झाले.बोलणे तर रोजच होत होते; पण सांगत नव्हतानिनाद यांचा वडिलांना मंगळवारी सायंकाळीच भ्रमणध्वनी आला होता. त्यावेळी त्याने नेहमीप्रमाणेच विचारपूस केली. असेही तो कुठेही असला तरी, दरररोज न चुकता सकाळी किंवा सायंकाळी फोनवरून बोलत असे. मंगळवारी सायंकाळी त्याला कोठे आहेस असे विचारले तेव्हा त्याने श्रीनगरला एवढ्या एका शब्दात उत्तर दिले अशी माहिती त्याचे वडील अनिल मांडवगणे यांनी दिली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भारत-पाक तणावाबाबत मात्र तो चकार शब्दही बोलला नाही. अगदी मंगळवारी सकाळी त्याला विशेष मोहिमेवर पाठविण्यात येणार आहे, याची साधी कल्पनाही त्याने दिली नाही.बॅँक कॉलनीत शोककळाशहीद निनाद यांचा मंगळवारी सकाळी विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे वृत्त सायंकाळी नाशकात येऊन धडकले. त्यावेळी डीजीपीनगर येथील बॅँक कॉलनीतील श्री साईस्वप्न को-आॅप. सोसाायटीकडे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. परंतु मांडवगणे कुटुंब लखनौला गेलेले असल्याने घराला कुलूप आढळले. दरम्यान या दु:खद घटनेबद्दल सर्वत्र शोक व्यक्त करण्यात आला. शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी गर्दी केली होती.शहीद निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी ‘पुस्तकी वा कादंबरी छाप शब्दांचा वापर करून भावना व्यक्त करण्यात काय अर्थ आहे,’ असा सवाल करून निशब्द राहणे पसंत केले.अंत्यसंस्कार नाशिकला होणारमांडवगणे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक सारेच नाशिकचे असल्यामुळे निनाद यांच्यावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. लखनौहून विमानाचे तिकिटे कोणती व कशी मिळतात त्यावर उद्यापर्यंत नाशकात पोहोचू असे ते म्हणाले. मात्र निनाद यांच्याबाबत सरकार, लष्कर, एअर फोर्स काय निर्णय घेते हे आम्हाला माहिती नाही. त्यानंतरच अंंत्यसंस्काराबाबत सांगता येईल, असेही मांडवगणे यांनी सांगितले.मूळचे नाशिकचे अनिल मांडवगणे व सौ. सुषमा यांना दोन मुले. त्यातील मोठा निनाद व दुसरा नीरव असून, तो जर्मनीत सीए करीत आहे. बॅँक आॅफ इंडिया, कोलकाता येथे बॅँक व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर अनिल मांडवगणे यांनी नाशिक-पुणे रोडवरील डीजीपीनगर क्र. एक समोर असलेल्या श्री साईस्वप्न को-आॅप. सोसायटीत स्थायिक झाले आहेत.
मुलीचा वाढदिवस साजरा न करताच निनाद गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 1:17 AM