तरसाळी : औंदाणे येथील मातेने आपल्या मुलीसाठी किडनी (मूत्रपिंड) दिल्याने मुलीला जीवदान मिळाले आहे. या मातेने समाजात नवीन आदर्श निर्माण केला आहे.चिला निकम यांची कन्या मयूरी हिचा सोमपूर (ता.बागलाण) येथील नितीन पाटील यांच्याशी पाच वर्षांपूर्वी थाटामाटात विवाह झाला. बागलाण पंचायत समितीत लेखा विभागात लिपिक म्हणून पाटील सेवेत आहेत. नितीन व मयूरी यांना एक लहान मुलगी आहे. मयूरीला चार महिन्यांपूर्वी अचानक तोंडावर सूज येणे, हाता-पायाला सूज येणे असा शारीरिक त्रास सुरू झाला. अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या असता किडनीमुळे हा त्रास उद्भवल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला. त्यानंतर मूत्रपिंडाची थेट तपासणी केली असता मयूरीच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्याचे या तपासणीत सिद्ध झाले. ऐन तारुण्यात पोटच्या मुलीच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याचे समजल्यानंतर आई कमल निकम चिंताग्रस्त झाल्या. आई कमलबाईच्या किडन्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर नशिबाने मयूरीला आईची किडनी ‘मॅच’ झाली. त्यासाठी आई कमल व मुलगी मयूरी या दोघांवर मुंबई येथील खासगी दवाखान्यात मूत्रपिंड रोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली. सध्या मायलेकी अतिदक्षता विभागात असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. (वार्ताहर)
मातेच्या किडनीमुळे मुलीला जीवदान
By admin | Published: June 23, 2014 11:29 PM