नाशिक : नाशिकमधील एका मुलीने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी आपल्या दोन मित्रांच्या सहकार्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचून आपल्याच घरच्यांकडे सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे़ शहर पोलिसांनी या प्रकरणाचा भंडाफोड करून संशयित साहील महिंद्र भांगरे (२०़, रा़ पाथर्डी फाटा) यासह एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे़ माझ्या मुलीचे अपहरण झाले असून, सुटकेसाठी अपहरणकर्ते सात लाख रुपयांची खंडणी मागत असल्याची तक्रार एका कुटुंबाने सातपूर पोलिसांकडे मंगळवारी (दि़ २०) केली़ पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असता सकाळी साडेसहा वाजता मुलगी नेहमीप्रमाणे अशोकस्तंभ परिसरात शिकवणीसाठी गेली़ मात्र सकाळचे दहा वाजून गेले तरी मुलगी न आल्याने त्यांनी शिकवणीच्या ठिकाणी विचारणा केली असता सकाळी ९ वाजताच मुलगी घरी गेल्याचे सांगण्यात आले़ दुपार होऊनही घरी न आलेल्या या मुलीच्या कुटुंबीयांना सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास सात लाख रुपये खंडणी मागणारा फोन आला़ मुलीचे अपहरणकर्ते वारंवार एकाच मोबाइलवरून मुलीच्या कुटुंबीयांना फोन करून खंडणीची मागणी करीत होते़ सातपूर पोलीस तांत्रिक शाखेची मदत घेऊन आपल्यापर्यंत पोहोचणार असल्याचे समजताच या दोघांनी तरुणीला आपल्या घरी जाण्यास सांगितले़ पोलिसांनी संशयित भांगरे व अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून धमकीसाठी वापरलेला फोन हस्तगत केला़ तसेच घरी पोहोचलेल्या या मुलीला ताब्यात घेऊन तिच्याकडील माहितीत तफावत आढळल्याने मुलीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव केल्याचे समोर आले़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित साहिल व त्याचा मित्र या दोघांवर अपहरण, खंडणी तसेच जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे व पथकाने या गुन्ह्याची उकल केली़संशयितांनी केली मोबाइलची चोरीखंडणीच्या मागणीसाठी संशयितांनी वापरलेला मोबाइल हा परीक्षेसाठी जळगावहून नाशिकला आलेल्या युवकाचा चोरण्यात आला होता़ त्याच्याकडून संशयितांनी मेसेज पाठविण्याच्या नावाखाली मोबाइल घेतला व दुचाकीवरून फरार झाले़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मॉडेलिंगच्या करिअरसाठी मुलीचा स्वत:च्या अपहरणाचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:15 AM