नाशिक : मुलींनी लहान वयातच आपले ध्येय निश्चित करून त्याची कास धरावी अन् जीवनात काहीतरी बनून स्वत:ला सिद्ध करावे. आपल्यातील गुण ओळखून ते अधिक वाढतील यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी केले. ‘संकल्प स्त्रीत्वाच्या सन्मानाचा’ या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. बुधवारी (दि.१७) कालिदास कलामंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद, अहिल्या फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हाभरात ३ लाख सॅनिटरी नॅपकिन व व्ही वॉश लिक्विड वाटपाचा ‘वंडर बुक आॅफ रेकॉर्ड, लंडन’ विक्रम यावेळी करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या, मुलींनी मासिकपाळीबाबत न लाजता तिला आपली मैत्रीण मानून तिच्या सोबतीने सकारात्मकतेने जीवनाचा प्रवास करावा. मासिकपाळी ही कटकट नसून तिचे कारण पुढे करत घरी बसणे चुकीचे आहे. सॅनिटरी नॅपकिनच्या किमती आणखी कमी करण्याचा महाराष्टÑ शासन प्रयत्न करत असून मुलींनी सॅनिटरी नॅपकिनचा हुशारीने वापर करण्याचा, त्याची तितक्याच जबाबदारीने विल्हेवाट लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात सॅनिटरी नॅपकिन वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील के.टी.एच.एम., व्ही. एन. नाईक व एसएमआरके महाविद्यालय या ३ महाविद्यालयांना ३ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन व सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन भेट देण्यात आले. प्रारंभी जिल्हा परिषद परिचारिका आसावरी केदारी यांनी मुलींना मासिकपाळी याविषयी केले. याप्रसंगी डॉ. अनिला सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, आमदार देवयानी फरांदे, आमदार दीपिका चव्हाण, महापौर रंजना भानसी, महिला बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, अनिता भुसे, मनीषा पवार, मनीषा पगारे, सुनीता चारुस्कर, वैशाली झनकर, शेफाली भुजबळ, शांती राधाकृष्ण, अर्चना मुंढे, रोहिणी दराडे, जान्हवी जाधव, जयश्री गिते, स्वरांजली पिंगळे, सीमा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. १४ व १७ वर्ष वयोगटाखालील मुलींचा खो-खो संघ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. मोहिनी भुसे हिच्या संबळ वादनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. सुप्रिया जाधव हिच्या मनोगताने यावेळी उपस्थितांची दाद मिळविली.दीड लाख मुलीजिल्हाभरातील १५०० शाळांमध्ये ४५ मिनिटांच्या कालावधीत एकाचवेळी हा उपक्रम राबविण्यात आला. ‘८वी ते १०वी’तील दीड लाख मुली या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. अमृता फडणवीस यांच्या हस्ते व रेकॉर्ड समन्वयक अमि छेडा यांच्या उपस्थितीत रेकॉडचे प्रशस्तीपत्र, मेडल सुपूर्दकरण्यात आले.
मुलींनी ध्येय निश्चित करावे :अमृता फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 1:09 AM