गंगापूर - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गिरणारे वाडगाव रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरेाप केला जात आहे. याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली असून येथील कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गिरणारे ते वाडगाव दरम्यान कित्येक वर्षे रखडलेल्या रस्त्याचे कामकाज सुरू झाले असून ते कामकाज नित्कृष्ट होत आहे अशी तक्रार स्थानिक गावकऱ्यांनी खासदार,आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बाल कल्याण सभापती,गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेली आहे. या कामकाजाची तातडीने चौकशी व्हावी, रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गिरणारे गावापासून वाडगाव ते थेट आळंदी धरण, दिंडोरी तालुक्यात हा रस्ता जातो. या रस्त्याच्या कामाची मागणी सातत्याने करण्यात आल्यानंतर आता कुठे रस्ता मंजूर झाला. मात्र कामकाज समाधानकारक नसल्याने ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केलेल्या आहेत. येथील कामाची चौकशी करावी, अशी मागणी सचिन कसबे, अक्षय कसबे, कपिल कसबे यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.