नाशिक : तीन महिने उलटूनही हजारो विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळालेला नसल्याने प्रवेशासाठीची आॅनलाइन प्रक्रिया त्वरित बंद करून विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्यावा, अशी मागणी शहर कॉँग्रेस सेवादलाने केली आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, १०वी परीक्षेचा निकाल जून २०१८ मध्ये लागला असून, आॅगस्ट महिना संपत असताना अद्यापही ११वीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. गेल्या वर्षापासून सुरू केलेल्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असून, आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया त्वरित बंद करून जुन्या पद्धतीने ११वीच्या विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश देण्यात यावा. शासन नियमाप्रमाणे शहरी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थाना पासून ३ किलोमीटरच्या आत प्रवेश देणे बंधनकारक असूनही तसे होत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष वसंत ठाकूर, राहुल पाटील, इजाज सय्यद, दीपक परदेशी, विजय अहेर, पराग काळे, अक्षय परदेशी, राजेश गांगुर्डे, सचिन जाधव, मिलिंद वाबळे, ज्ञानेश्वर चव्हाण, रणजित परदेशी, आतिष पाटील आदी उपस्थित होते.
वंचित विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:05 AM