नांदगाव : मृग नक्षत्र संपत आले तरी मान्सून बरसत नसल्याने ग्रामीण भागात चलबिचल दिसून येत आहे. आता वरुणराजाला वेगवेगळ्या माध्यमातून साकडे घातले जात असून पाण्यासाठी आर्जव केले जात आहे. तालुक्यातील ढेकू येथील महिलांनी एकत्र येत ‘बेंडकुळ्या बाई पाणी दे’, ‘बरस रे बरस रे, मेघराजा बरस रे’ अशी गाणी गात वरुणराजाला प्रार्थना केली.मान्सूनचे आगमन लांबत असल्याच्या वार्तांनी ग्रामीण भागाचा जीव मेटाकुटीला आला आहे. ढेकू येथे महिलांकडून बेंडकुळ्या बाई पाणी येऊ दे... सळगंधारी, अर्ज कर देवा द्वारी पाणी येऊ दे... सळगंधारी....बरस रे बरस रे मेघराजा बरस रे, बरसुंगा तो बरसुंगा सब दुनिया बरसुंगा..., हातात इट्टी बायको बुट्टी, पाणी द्या बाई पाणी द्या. आदी गाणी म्हणून वरुणराजाला प्रार्थना केली जात आहे. देवा लवकर पाऊस पडू दे. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा , शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सोडव असे साकडेही घातली जात आहे. जो पर्यत वरूण राजा बरसत नाही तो पर्यत सदर महिलावर्ग रोज गाणी म्हणत महिला देवाला प्रार्थना करणार असल्याचे सरपंच सौ ज्योती सुर्यवंशी यांनी सांगितले. यामध्ये सुमनबाई चव्हाण,ताराबाई चव्हाण,रेखा पवार,योगीता सुर्यवंशी, शिला जाधव,सविता बावचे,शोभा सुर्यवंशी,रत्ना जाधव,सोनाली जाधव,ललीता राठोड,कुंदाबाई लुटे,बेबीबाई राठोड,आदी महिला सहभागी झालेल्या आहेत.
बेंडकुळ्या बाई पाणी दे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 5:25 PM
महिलांचे आर्जव : मान्सून लांबल्याने शेतकरी मेटाकुटीला
ठळक मुद्देवरूण राजा बरसत नाही तो पर्यत सदर महिलावर्ग रोज गाणी म्हणत महिला देवाला प्रार्थना करणार