नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केल्यानंतर काळा पैसा बाहेर पडला असेल तर शासनाने त्यातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दारिद्र्य रेषेखालील महिलांच्या खात्यावर पंचवीस हजार रुपये भरावेत, अशी मागणी शहर कॉँग्रेस सेवादलाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, नोटबंदीनंतर ५० दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल असे ठामपणे सांगितले होते, परंतु अजूनही परिस्थिती सुरळीत झालेली नसून, शेतकरी व मजुरांनी आत्महत्त्या केल्या आहेत, तर अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. मालेगावी याच परिस्थितीमुळे एका यंत्रमाग कामगाराने आत्महत्त्या केली आहे; मात्र केंद्र सरकार परिस्थिती पूर्ववत असल्याचे सांगत आहे. सरकारकडे जर काळा पैसा आला असेल तर तो सामान्य कर्जमाफीसाठी तसेच गरीब महिलांच्या बॅँक खात्यात टाकून नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी शशीकांत मंगरुळे यांना निवेदन दिले. त्यावेळी मिलिंद शिरसाठ, निरंजन पाटील, राहुल पगारे, भगवान अहेर, एजाज सय्यद, आकाश घोलप, राजेंद्र शिरसाठ, संघर्ष शेरकर, आनंद परदेशी, गणेश बोराडे आदि उपस्थित होते.
काळा पैसा गरिबांना द्या; सेवादलाची शासनाकडे मागणी
By admin | Published: December 31, 2016 12:20 AM