नायगाव : संपूर्ण देशासह राज्यात सर्वच क्षेत्रातील व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासन परवानगी देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भजन, कीर्तन व प्रवचनास शासनाने परवानगी देण्याची मागणी ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले व शिवानंद महाराज भालेराव यांनी केली आहे.पाचव्या लॉकडाऊन नंतर देशासह राज्यात सध्या सर्वच क्षेत्रातील उद्योग-धंदे शासनाच्या नियम व अटींचे पालन करून हळूहळू सुरळीत होत आहे. त्याच धर्तीवर कोरोनामुळे इतिहासात प्रथमच कुलूप बंद झालेले देवालयेही सध्या काही अटींवर भाविकांसाठी उघडली गेली आहेत. सध्या देशासह महाराष्ट्रामध्ये शासनाने लग्नविधी, अंत्ययात्रांकरीता तसेच हॉटेल व्यवसायिकांना पार्सल सुविधोसाठी परवानगी दिलेली आहे. मात्र वारकऱ्यांना नामसंकीर्तनास मनाई आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून भजन, प्रवचन, कीर्तन बंद आहे. शासनाने भजन-कीर्तन, प्रवचन सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी द्यावी अशी मागणी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी केली आहे. सर्व वारकरी शासनांच्या सर्व नियमांचे पालन करून नामसंकीर्तन करतील. त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल. सध्या हा पंढरपूर कडे जाणा-या वारीचा काळ असून महाराष्ट्रातील लाखो वारक-यांना सध्या घरीच राहून नामस्मरण करण्याची वेळ आलेली आहे. गावांमध्ये स्थानिक मंदिरांमध्ये शासनाने त्यांना भजन-कीर्तन करण्याची परवानगी द्यावी. तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावात कीर्तन सप्ताह झालेला नाही. हजारो कीर्तनकार सध्या आपापल्या घरीच बसून आहेत. त्यामुळे असंख्य कीर्तनकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कीर्तनकारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी वारक-यांमधून होत आहे.
नामसंकीर्तनासाठी द्या सशर्त परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 4:39 PM
कीर्तनकारांची मागणी : वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
ठळक मुद्दे तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावात कीर्तन सप्ताह नाही.