नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांना एकसमान पेन्शन द्या, बेघरांना घरकुल द्या, हिंदमाता स्वातंत्र्य सैनिक सोसायटीच्या ताब्यात शासनाने जागा द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.९) लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.क्रांती दिनानिमित्त नाशिक शहर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समितीच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकामध्ये सकाळी ध्वजारोहण करत स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाºया शहिदांना अभिवादन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरूवात करण्यात आली. ‘वंदे मातरम.., भारत माता की जय..., स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे.., अशा विविध घोषणा देत दुपारी तीन वाजेपर्यंत स्वातंत्र्यसैनिकांनी उपोषण केले. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष पंडीत येलमामे, सरचिटणीस वसंत हुदलीकर यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडक र यांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शासनाचे प्रतिनिधी म्हणून स्वातंत्र्यसैनिकांच्या मागण्या सरकारी दरबारात पोहचवून त्यांना न्याया मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली. उतारवयात स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या न्याय हक्कांसांठी भारत सरकारकडे संघर्ष करावा लागत आहे, ही मोठी शोकांतिका असल्याचे येलमामे यांनी यावेळी सांगितले. समितीचे सर्व पदाधिकारी स्वातंत्र्यसैनिक वृध्दापकाळात पोहचले असून त्यांच्या मागण्या सरकारकडून पुर्ण केल्या जात नसल्याने क्रांती दिनाच्या औचित्यावर स्वातंत्र्यसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या देत उपोषण केले. यावेळी दगडूसा कलाल, मनोहर कुलकर्णी, सरस्वतीबाई मोरे, विमलबाई आटवणे, सरस्वतीबाई पाटील, सत्यभामा मोजाड, जीजाबाई शिंदे, लक्ष्मीबाई गायकवाड आदि उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांना एकसमान पेन्शन द्या :लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:45 PM