नाशिक : माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्चात समर्थकांनी शिस्त आणि संयमी वृत्तीचे दर्शन घडविले. याचबरोबर शहरात येणाऱ्या समर्थकांचे स्वागत करतानाच त्यांच्या सहभागाबद्दल आभाराचे फलक झळकवत कृतज्ञता व्यक्त करण्यासही संयोजक विसरले नाहीत.नाशिकमध्ये दि. २४ सप्टेंबरला मराठा क्रांती मूक मोर्चा निघेपर्यंत भुजबळ समर्थकांच्या मोर्चाची तारीख घोषित झालेली नव्हती. मराठा समाजाचा विराट मोर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भुजबळ समर्थकांची मोर्चासाठी बैठक होऊन त्यात ३ आॅक्टोबर तारीख निश्चित करण्यात आली. त्यानंतर गावोगावी बैठकांचे सत्र सुरू झाले. मोर्चाचा आराखडा तयार करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचा पॅटर्न घेऊन त्यानुसार आचारसंहिता तयार करण्यात आली. दिवसरात्र बैठका होऊन मोर्चाचे नियोजन करण्यात आले. अवघ्या आठ ते दहा दिवसांत सर्वत्र सांगावे गेले आणि त्याची फलश्रुती म्हणून लाखोच्या संख्येने जनसागर रस्त्यावर एकत्र आला. राज्यातील विविध जिल्ह्यांतून तसेच मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, कर्नाटक आदि राज्यांतूनही ओबीसी समाजबांधवांनी नाशिकला मोर्चासाठी हजेरी लावली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी भुजबळांची प्रतिमा असलेले पिवळे ध्वज लावण्यात आल्याने शहरात मोर्चाची वातावरणनिर्मिती झाली होती. मोर्चात सहभागी होणाऱ्या समर्थकांच्या स्वागताचे फलक ठिकठिकाणी झळकले होते. त्यांच्या चहा-नास्त्यासह निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था होती. तपोवनातून मोर्चाला सुरुवात झाली त्याठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले, तर रविवार कारंजा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिकठिकाणी मोर्चात सहभागी झाल्याबद्दल समाज बांधवांचे आभार मानणारेही फलक दिसून आले. शिस्त आणि संयमाचे दर्शन घडवित भुजबळ समर्थकांनी आणखी एका आदर्शवत मोर्चाचा दाखला महाराष्ट्रापुढे ठेवला. (प्रतिनिधी)
स्वागत अन् आभाराचेही झळकले फलक
By admin | Published: October 04, 2016 12:34 AM