नाशिक : जुलै महिन्याच्या मध्यावरदेखील सर्व शाळा, महाविद्यालये अद्यापही बंद असल्याने मुलांचे पुन्हा ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल, लॅपटॉपच्या स्क्रीन टाइममध्ये झालेली प्रचंड वाढ विशेषत्वे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर परिणामकारक ठरणारी आहे. मुलांचे घराबाहेरचे बहुतांश खेळ यापूर्वीच बंद झालेले असल्याने बहुतांश मुले अभ्यासानंतरही तासनतास मोबाइलवर खेळण्यातच व्यतीत करीत आहेत. त्यात कार्टून्स, गेम्स, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स अशा मनोरंजनाच्या नवीन साधनांची मुलांना चटक लागली असल्याने मुलांच्या सरासरी स्क्रीन टाइममध्ये पाचपट ते सहापट वाढ झाली आहे. या सर्व बाबींमुळे मुलांना सर्वाधिक डोळ्याचे विकार, मानसिक स्वास्थ्यातील बिघाडात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना चष्मे लागणे, डोळ्यात जळजळ होण्याचे प्रमाण तिपटीहून अधिक वाढले आहेत.
अनेक लहान मुले तर मोबाइल हातात असल्याशिवाय जेवणदेखील करीत नाहीत, इतके व्यसन मोबाइलचे लागले आहे. कोरोनापूर्वीच्या काळात अनेक घरांमध्ये मुलांना मोबाइलपासून लांब ठेवण्यात आले होते किंवा फार तर काही वेळासाठीच मोबाइल हातात मिळत होता; पण ऑनलाइन शिक्षणामुळे मुले घरात बसून मोबाइल स्क्रीनच्या खूप काळ जवळ राहू लागली आहेत. त्यामुळे विशेषत्वे डोळ्यांचे अगदी भरून निघू न शकणारे नुकसान होत आहे. मात्र, सजग पालकदेखील निरुपाय झाल्याने हतबलता व्यक्त करीत आहेत.
इन्फो
निश्चित वेळमर्यादेचे बंधन आवश्यक
दोन वर्षांआतील मुलांना मोबाइलसारखी साधने हातात देऊच नयेत, तर ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गॅजेट्स वापरू देऊ नयेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. सहा ते दहा वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या मुलांचा मोबाइल स्क्रीन वापराबाबतचा वेळ एक ते दीड तासापेक्षा जास्त नसावा. तर त्याहून मोठ्या मुलासाठी तीन तासांचा वेळ निर्धारित असावा. त्याचबरोबर त्यांना झोपण्यासाठी, खेळण्यासाठी पुरेसा वेळ असावा. मात्र, प्रत्यक्षात शाळा, क्लासेस, गृहपाठ आणि मनोरंजन अशा सर्वच गोष्टी ऑनलाइन सुरू असल्याने स्क्रीन टाइमवर मर्यादा कशा आणायच्या, असा प्रश्न पालकांना सतावत आहे.
इन्फो
डोळ्यांच्या विकारात तिपटीने वाढ
कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाइलवर जास्त लक्ष केंद्रित झाल्यामुळे चष्मे लागण्याचे प्रमाण दोन ते तीनपटीने वाढले आहे. लॅपटॉप, मोबाइल व टीव्हीपासून निघणारे नील किरण डोळ्यांसाठी घातक असतात. या किरणांमुळे डोळ्यातील रेटिनाला त्रास होतो. स्क्रीन वापरताना पापण्याची उघडझाप कमी होते. त्यामुळे डोळ्यात कोरडेपणा, जळजळ, अंधूक दिसणे, डोळे दुखणे, मान व खांदे दुखणे हे विकार होतात. मुले सतत डोळे चोळतात. यालाच डिजिटल व्हिजन सिंड्रोम किंवा डिजिटल आय स्ट्रेन म्हणतात. जवळून स्क्रीन पाहिल्याने मायनस नंबरच्या चष्म्याचे प्रमाण वाढते.
इन्फो
या उपयांची अंमलबजावणी व्हावी
स्क्रीनला डोळ्यापासून दूर ठेवावे. मोबाइलपेक्षा लॅपटाॅपला प्राधान्य द्यावे. ऑनलाइन क्लासेस स्मार्ट टीव्हीवर घेणे. अन्य कोणत्याही स्क्रीनचा उपयोग कमी करावा. अधूनमधून पापण्यांची उघडझाप करावी. डोळ्यात जास्त कोरडेपणा वाटत असल्यास डॉक्टरी सल्ल्याने आय ड्रॉप वापरावा. मोबाइल स्क्रीनला अॅन्टी ग्लेअर स्क्रीन कोटिंग करून घ्यावे. तसेच दर दोन तासांनंतर स्क्रीनपासून लांब जाऊन पंधरा मिनिटांनंतरच स्क्रीनवरील काम करावे. तसेच आधीच नंबर असल्यास डोळ्यांची नियमित तपासणी करून डोळ्याचे नंबर दर सहा महिन्यांनी तपासून घ्यावेत.
कोट
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांबाबतच्या तक्रारींच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याबाबत पुरेशी दक्षता घेण्याची नितांत गरज आहे. स्क्रीन आणि डोळ्यात किमान तीन फुटांचे अंतर ठेवावे, दर पंधरा- वीस मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवून वीस फूट लांब पाहावे. किमान अर्धा मिनिट डोळ्यांना आराम द्यावा. त्यामुळे डोळ्यांच्या मसल्सना विश्रांती मिळून डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल.
डॉ. शरद पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ
-------------
ही डमी आहे.